पिंपरी, ता. 11 : आई तु उन्हा मधली सावली.. आई तु पावसातील छत्री .. आई तु थंडीतील शाल .. आता यावीत दुःखे खुशाल .. अशी कवितेतील चार वाक्य मनात गुणगुणली तरी संकट घडीला मनाला आधार मिळतो. ऋतु कोणताही असो.. म्हणजे संकट कोणतही असो. कितीही मोठ असु दे.. आई सदैव विविध रुपात आपली सोबत करीत असते.
रविवार (ता.9) मे संपुर्ण जगात मायवार ( मदर डे ) मोठ्या उत्साहात साजरा झाला. जगभरात कोरोनाचा संकट घोंगावत असताना देखील मुलांना आपल्या आई सोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. अनेकांनी आपल्या आई सोबत काढलेला हसरा सेल्फी सोशल मिडियावर व्हायरल करीत आई प्रति आपले प्रेमळ भावना व्यक्त केली. काही जणांनी केक कापुन तर काही जणांनी आईला आवडती वस्तु भेट स्वरुपात देऊन मायवारचा आनंद लुटला.
.. पण .. ज्या लोकांची आई देवा घरी गेली आहे. अशा लोकांनी आपला मायवार कसा साजरा केला असेल. मग ते लोक आईच्या आठवणीने घरातील तिच्या फोटो समोर रडत बसले का.. रडत बसले देखील असतील. हे सहाजिक आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील एका युवकाने मात्र मायवार वेगळ्या प्रकारे साजरा केला आहे. युवा सामाजिक कार्यकर्ते संदेश बोर्डे असे या युवकाचे नाव आहे. या युवकाने आपल्या आईच्या स्मरणार्थ रस्त्याच्या कडेला गाणी गात बसलेल्या दृष्टीहिन बांधवांना धान्य वाटप करुन आपला मायवार साजरा केला आहे.
कोरोनाची साखळी मोडण्यासाठी प्रशासनाने शहरात कडक निर्बंध लागु केले आहेत. संचारबंदी कायदा लागु आहे. परिणामी, रस्त्यावरील लोकांची वर्दळ कमी आहे. तरी देखील हे दृष्टीहिन बांधव पोटाची खळगी भरण्यासाठी मदतीच्या अपेक्षेने गाणे गात बसले असल्याचे मनाला सुन्न करणारे चित्र संदेश बोर्डे यांनी पाहिले. आणि मायवार निमित्त या दृष्टीहिन बांधवांना एक हात मदतीचा त्यांनी पुढे केला.
उपस्थित सर्व कलाकार दृष्टीहिन बांधवांना अनपेक्षित पणे मायवार ची अनोखी भेट मिळाल्याने काही क्षण ते भारावुन गेले.
युवा कार्यकर्ते संदेश बोर्डे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. आपली आई नाही म्हणुन काय झाले.. आपण मायवार हा साजरा करायचा. असा निर्धार करुन त्यांनी आपले सहकारी डेव्हिड काळे, पास्टर बन्यामिन काळे, अनिता जयराज, वनिता पिल्ले आणि मनोज पिल्ले यांच्या सहकार्याने हा मायवार दृष्टीहिन बांधवांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला.
दिवस भर आम्ही गाणे गात असतो. मात्र, काही ठराविक लोक आहेत. जे आम्हांला मदत करतात. असे सांगताना त्यांचा गहिवरुन आले. कोरोनाची साखळी मोडण्यासाठी सर्व स्तरावरुन युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. शासन, प्रशासन, आरोग्य व्यवस्था, पोलीस यंत्रणा हे रात्रीचा दिवस करुन कोरोनाशी लढा देत आहेत. अशा वेळी समाजातील अनेक घटकांना या भयावह परीस्थितीशी सामना करणे कठीण होऊन गेले आहे. उत्पन्नाचे साधण बंद झाल्याने उपासमार होण्याची वेळ आली आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या या संकट घडीला अनेक सामाजिक संघटना, संस्था यांनी पुढाकार घेत विविध उपक्रम राबवित, गोरगरीब तसेच गरजु लोकांना मदतीचा हात पुढे केला होता. यामुळे कसाबसा त्यांचा निभाव लागला. मात्र, यंदाच्या कोरोनाच्या संकट घडीला अनेक अशा संघटनांनी आपला हात आकडता घेतला आहे. मोजके कार्यकर्ते सोडले तर संघटनांनी गोरगरीबांकडे अक्षरशः पाठ फिरवली आहे. मात्र, असे करु नका. आपल्या आजुबाजुला असलेल्या गरजु, गरजवंत लोकांना मदत करा. असे आवाहन युवा सामाजिक कार्यकर्ते संदेश बोर्डे यांनी केले आहे.