शबनम न्युज / पिंपरी
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला असताना कोरोनापश्चात रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या मधुमेही रुग्णांना म्युकोरमायकोसिस या रोगाची लागण होत आहे. या बुरशीजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागले असून या रोगावर वेळीच उपचार करण्याची नितांत गरज आहे. या आजारावरील उपचारासाठी रुग्णांची धावाधाव होता कामा नये. त्यासाठी आवश्यक इंजेक्शन, औषधे, स्वतंत्र ऑपरेशन थिएटर सुरू करावे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी निष्णात ईएनटी सर्जनची आवश्यकतेनुसार नियुक्ती करावी, अशी सूचना उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी प्रशासनाला केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात उपमहापौर हिराबाई घुले यांनी म्हटले आहे की, महापालिका प्रशासन झोकून देऊन कोरोना विरोधातील लढाई लढत आहे. या प्रयत्नांना यश येत असून शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. परंतु, कोरोनाची रुग्णसंख्या स्थिरावत असल्याचा दिलासा मिळत असतानाच दुसरे संकट उभे राहिले आहे. ज्या कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक्षमता कमी आहे किंवा ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकोरमायकोसिस हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या रुग्णांना डोळे आणि कानाला बुरशी आल्याने त्रास होतो. वेळीच उपचार मिळाले नाही. तर, डोळ्यांवाटे हा संसर्ग मेंदूमध्ये जाऊन रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. म्युकोरमायकोसिस ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिक रित्या अस्तित्वात असते. परंतु प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर या प्रकारच्या बुरशीचा शरीरामध्ये संसर्ग होतो. श्वासोच्छ्वासावाटे या बुरशीचे कण शरीरात गेल्यानंतर फुप्फुस तसेच वरच्या जबड्यातील सायनस मध्ये आणि वरच्या जबड्यामध्ये दुष्परिणाम होतो, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. गेल्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरात या आजाराचे रुग्ण आढळू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या रुग्णांवर वेळीच उपचार करून त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. रुग्णांवर उपचार करण्यासाठी निष्णात ईएनटी सर्जनची आवश्यकतेनुसार नियुक्ती करावी. या रुग्णांना लागणारी औषधे, वैद्यकीय साधने आणि पुढे लागणारी ओपीडीची सुविधा निर्माण करावी.
म्युकोरमायकोसिस या आजारासाठी लागणारी औषधे, इंजेक्शन महाग आहेत. त्यामुळे काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेळीच या इंजेक्शनचा पुरेसा साठा करावा. या रोगाचा अटकाव करण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत, अशी मागणी उपमहापौर नानी घुले यांनी निवेदनातून केली.