महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरीत निषेध आंदोलन
– खतांची दरवाढ करून केंद्र सरकारने शेतक-यांचेही कंबरडे मोडले
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – कोरोना महामारीच्या संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या देशवासियांना पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ करून आणखी संकटाच्या खाईत लोटण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. इंधन, गॅस दरवाढीसोबत खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने देशातील शेतक-यांचेही कंबरडे मोडले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी सोमवारी (दिनांक १७ मे २०२१) महागाईच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात केलेल्या आंदोलनात केली.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला अध्यक्षा वैशाली ताई काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, अजित गव्हाणे, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, विधानसभा अध्यक्ष संदीप चिंचवडे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, प्रदेश ओबीसी प्रभारी सचिव सचिन औटे, पदवीधर शहराध्यक्ष माधव पाटील, युवक संदीप उर्फ लाला चिंचवडे, महिला संघटिका कविताताई खराडे, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष यतीन पारेख, पिंपरी विधानसभा महिला अध्यक्ष पल्लवी पांढरे, भोसरी विधानसभा महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, कामगार सेल अध्यक्ष किरण देशमुख, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष संगीता कोकणे, सरचिटणीस अमोल भोईटे, उपाध्यक्ष अकबर मुल्ला, संतोष वाघेरे,शशिकांत निकाळजे, अभिजित आल्हाट, रशीद सय्यद, निखिल दळवी, बाळासाहेब पिल्लेवार, ज्योती निंबाळकर, सुनील अडागळे, पोपाट पडवळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पुढे बोलताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले, भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. गॅसचे दर सातत्याने वाढविले जात आहे. कोरोना संकटाचा परिणाम उद्योग, धंदे, व्यावसायावर झालेला आहे. या परस्थितीत केंद्रातील सरकारने नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. परंतु, केंद्रातील सरकार इंधन, गॅस दरवाढ करून जनतेला आणखी संकटात टाकण्याचे काम करत आहे. पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्यावर गेलेले आहेत. केंद्र सरकारने म्हणजेच देशातील भाजप सरकारने आज जनसामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. संकटाच्या घडीला खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम भारत सरकारने केले आहे. १०.२६.२६ ची किंमती ६०० रुपयांनी वाढली आहे.
डिएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डिएपी ११८५ रुपयांना होता. तो आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ चे पन्नास किलोंचे पोते ११७५ रुपयांचे होते ते आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमती वाढविल्या आहेत. देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे पाप भाजप सरकारने केले. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे. ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे.