शबनम न्यूज
नायगाव (नांदेड ) : दारुच्या नशेत असलेल्या दोन भाच्यांनी मामीला केलेल्या मारहाणीत मामीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १६ )रोजी सायंकाळी तालुक्यातील धानोरा येथे घडली. मयत महीलेच्या मुलींनी दिलेल्या तक्रारीवरुन सदर प्रकरणी रविवारी रात्री उशिरा रामतीर्थ पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शांताबाई किशन जाधव यांच्या घरी त्यांचे दोन भाचे करण शंकर भांगे रा. गडगा ह.
मु. बोळेगाव ता. बिलोली व जेजेराव केरबा भंराडे बामणी ता.बिलोली हे (ता. १६) रोजी सायंकाळी दारु पिऊन आले. दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी सुरुवातीला मामीकडे आमच्यासाठी जेवन करा असे फर्मान सोडले. त्यानंतर कौटुंबिक विषयाला हात घालून मामीसोबत वाद घातला. त्यावेळी मामीने दारुच्या नशेत असलेल्या दोन्ही भाच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पुन्हा शिविगाळ केली. यामुळे संतापलेल्या मामीने इथून चालते व्हा असा दम भरताच जेजेराव भंडारे याने मामीला पाठीमागून धरले तर करण भांगे याने हातातील कड्याने डोक्यावर वार केले.
या मारहाणीत शांताबाई या बेशुध्द पडल्याने मुलगी शितल हिने आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी धावून आले व सदरच्या घटनेची माहिती रामतीर्थ पोलीसांना दिली. मामी बेशुध्द पडलेली आणि गावकऱ्यांनी पोलिसांना पाचारण केल्याने दोन्ही भाचे पळून जात होते पण गावकऱ्यांनी दोघांनाही पकडून झाडाला बांधून ठेवले होते. रामतीर्थ पोलिस घटनास्थळी धाव घेवून शांताबाई जाधव यांना रुग्णालयात दाखल केले पण त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर प्रकरणी मयत शांताबाई किशन जाधव यांची मुलगी शितल गुलाब सुर्यवंशी रा. नरसी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन भाच्यांनी किरकोळ कारणावरुन मामीसोबत वाद घातला असला तरी या गावात वेगळीच चर्चा असून दोन्ही आरोपींचा वेगळाच विचार होता असे बोलल्या जात आहे.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे