भोकरदन (जालना) : लग्नसमारंभ असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. रात्री वधूला हळद लागली अन् सकाळी विवाह सोहळा पार पडणार असल्याने उद्याच्या तयारीसाठी घरातील सगळे झोपी गेले. मात्र, होणाऱ्या नववधूच्या मनात काही वेगळेच सूरु होते. तिने भल्या पहाटे प्रियकरासोबत पळ काढला आणि सोबत जगण्या मरण्याच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमीयुगूलाने एकमेकांना मिठी मारत गळफास घेत जीवन संपविले.ही घटना भोकरदन तालुक्यातील मालखेडा गावात रविवारी (ता.१६) भल्या पहाटे चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नवनाथ सुरेश गायकवाड (वय २२, रा.मालखेडा, ता.भोकरदन) व स्नेहा राजू आव्हाड (वय १८, रा.चेंबूर मुंबई) असे गळफास लावून मृत झालेल्या प्रेमीयुगूलाचे नाव आहे
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नवनाथ गायकवाड व स्नेहा आव्हाड या दोघांचे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. दोघांनी सोबत जगण्या मरण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. मात्र, नियतीला व घरच्यांना हे मान्य नसावे म्हणून स्नेहा हिचा विवाह भोकरदन तालुक्यातील कोळगाव येथील शुभम संतोष साळवे यांच्यासोबत ठरला होता. विवाह सोहळा हा कोळगाव येथेच रविवारी (ता.१६) सकाळी ११ वाजता नातेवाईकांच्या मोजक्या उपस्थितीत होणार असल्याने वधुकडील व वराकडील सर्वजण शनिवारी (ता.१५) कोळगाव येथे जमा झाले होते. शनिवारी सायंकाळी वधूच्या हळदीचा कार्यक्रम देखील उत्साहात संपन्न झाला. सकाळी विवाह सोहळा असल्याने शनिवारी रात्री कार्यक्रम आटोपून सर्वजण झोपी गेले. मात्र, प्रेम एकाशी आणि विवाह दुसऱ्याशी हा विचार स्नेहाला झोपू देईना व त्याच रात्री ती नवनाथ याच्यासोबत कोळगाव येथून हळदीच्या अंगाने पळून गेली. आपण एकत्र जगू शकत नसलो तरी एकत्र मरू तर शकतो असे म्हणत नवनाथ व स्नेहा यांनी एकमेकांना मिठी मारत नवनाथ याच्या मालखेडा येथील घरातील लोखंडी पाईपला एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या करत जीवनयात्रा संपविली. दरम्यान ही घटना पहाटे चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे, पोलिस निरीक्षक शालिनी नाईक, सहायक पोलीस निरीक्षक राजाराम तडवी आदींनी घटनास्थळी धाव घेत दोघांना खाली उतरविले व दोघांची भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे