शबनम न्युज / पिंपरी
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे सेक्टर १२ येथील गृहप्रकल्पाची ऑनलाइन सोडत शुक्रवारी (दि. २१) होणार आहे. सोडतीचा कार्यक्रम घर बसल्या लाईव्ह पाहता येणार आहे.
प्राधिकरणातर्फे स्पाईन रोडलगत जाधववाडी येथे सेक्टर १२ मध्ये आर्थिक दुर्बल घटक (इडब्ल्यूएस) तसेच अल्प उत्पन्न घटकासाठी (एलआयजी) गृह प्रकल्प उभारण्यात येत आहे. यात आर्थिक दुर्बल घटकासाठी ३३१७ तसेच अल्प उत्पन्न गटासाठी १५६६ सदनिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. अर्जांची छाननी करून अंतिम प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमी भूमीवर सोडत पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार अल्पबचत भवन, पुणे येथे शुक्रवारी सकाळी आठला ऑनलाइन पद्धतीने ही सोडत काढण्यात येणार आहे.’
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना सोडतीच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची अनुमती नाही. मात्र फेसबुक व यूट्यूबद्वारे सोडतीचा हा कार्यक्रम लाइव्ह पाहता येणार आहे. त्याबाबतची लिंक अर्जदारांना पाठविण्यात येणार आहे. या सदनिकांसाठी ऑनलाइन पद्धतीने २१ हजारांवर अर्ज आले आहेत. त्यातील सोडतीत नाव आलेल्या लाभार्थ्यांची यादी शुक्रवारी प्राधिकरणाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत निघणार आहे. विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष सौरभ राव, जिल्हाधिकारी तथा प्राधिकरणाचे उपाध्यक्ष राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यावेळी उपस्थित राहणार आहेत. सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी तसेच म्हाडाचे माहिती व तंत्रज्ञान समन्वय अधिकार या चार सदस्यीय समितीच्या नियंत्रणाखाली ही सोडत काढण्यात येणार आहे.