उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
शबनम न्युज / मुंबई
म्युकरमायकोसिस आजाराचा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक ३० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात राज्यातील कोरोना परिस्थितीसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे (व्हीसीद्वारे), मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने उपाययोजनांसाठी तातडीने पावले उचलावीत असे निर्देश त्यांनी दिले. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी. यामध्ये लहान मुलांचे व्हेंटिलेटर तसेच त्यांच्यासाठी लागणारी औषधे, इतर उपचारांसाठीची सामुग्री उपलब्ध करावी. तिसरी लाट येण्यापूर्वी ही व्यवस्था यथाशिघ्र उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.