भारत बायोटेकला पुण्यातील जागा देण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे ; देशवासियांना लस लवकर मिळावी यासाठी आदेशाचे तातडीने पालन
शबनम न्युज / पुणे
पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे आदेश खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण पार पाडली आहे. भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प पुणे, नागपूरसह राज्यात कुठेही झाला असता तरी मला आनंदच झाला असता. त्यामुळे भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवल्याचा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप तद्दन खोटा, जनतेची दिशाभूल करणारा, औटघटकेच्या प्रसिद्धीसाठी, राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
देशावरील कोरोना संकट आणि लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीने स्वत:हून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी, भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या ‘इंटरवेट इंडिया प्रा लि.’ (बायोवेट) कंपनीची जागा मिळावी असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेतली व दाद मागितली. उच्च न्यायालयाने कोरोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले. राज्याचा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून न्यायालयाच्या आदेशाचे पालन सुनिश्चित करण्याची जबाबदारी आपण पार पाडल्याचे अजितदादांनी स्पष्ट केले.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र एक असून राज्याचा प्रत्येक जिल्हा, विभाग यांच्या औद्योगिक, आर्थिक, पायाभूत विकासासाठी महाविकास आघाडी सरकार बांधील आहे. विरोधकांनी खोटे, तथ्यहिन आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न आता थांबावावेत, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.