पुणे : एका सेवा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची जमीन बळकावण्यासाठी त्रास देत व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या भावावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ज्ञानदेव तनपुरे यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगलदास बांदल आणि बापूसाहेब बांदल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी परिसरात सेवानिवृत्त पोलिस ज्ञानदेव तनपुरे यांची २ एकर शेतजमीन आहे. मात्र, या जमिनीच्या भोवताली असलेले सुरक्षेचे कंपाउंड तोडून या ठिकाणी असलेल्या विहिरीतून बांदल व त्याच्या भावाकडून रोज जबरदस्तीने सहा टँकर पाण्याची चोरी केलो जात आहे. तसेच तक्रारदारांनी त्यांना अडवले असता बांदल यांच्याकडून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हणणे आहे. तसेच बांदल व त्यांच्या भावाकडून संबंधित शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे देखील तक्रारदार ज्ञानदेव तनपुरे यांनी तक्रारीत उल्लेख आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मंगलदास बांदल यांनी काम पाहिले आहे. मात्र,पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील एका नामांकित सराफ व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवित व जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडे तब्बल ५० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. फिर्यादीला व्हिडीओ क्लिपिंग दाखवून खंडणीसाठी ब्लॅकमेल करणे, असा आरोपही मंगलदास बांदल यांच्यावर आहे.
खंडणी प्रकरणात बांदल यांचे नाव चर्चेत आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. तसेच याच कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांची हकालपट्टी देखील करण्यात आली होती
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे