पिंपरी-चिंचवडमध्ये विविध ठिकाणी नवीन गॅस-विद्युत दाहिन्या कार्यान्वीत होणार
माजी आमदार विलास लांडे यांनी मानले पालकमंत्री अजित पवारांचे आभार
पिंपरी (प्रतिनिधी) –
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे आज मत्यू पावणा-या रुग्णांची संख्या पन्नासच्या घरात आहे. मागील आठवड्यात हीच संख्या दिवसाला शंभरच्या घरात होती. मृतांचा आकडा वाढल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी शवदाहिन्यांची (गॅस व विद्युत दाहिनी) कमतरता भासू लागली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास अंत्यसंस्कारअभावी मृतदेहांची हेळसांड होणार आहे. हे लक्षात येताच शहरातील शवदाहिन्यांची संख्या वाढवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा केल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये हायब्रिड पध्दतीच्या नवीन गॅस-विद्युत दाहिन्या बसविण्यासाठी सुमारे 25 कोटी एवढ्या रक्कमेपर्यंतचा खर्च पुरवठा (अनुदान) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाला तीन हजारहून अधिक लोकांची टेस्ट पॉझीटिव्ह येत होती. तर, दिवसाला सुमारे शंभर रुग्णांचा मृत्यू होत होता. मृतांची संख्या वाढू लागल्यामुळे शवाचे दहन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील आठ स्मशानभूमीवर अंत्यसंस्काराची व्यवस्था केली. मात्र, आठ शवदाहिन्या अपु-या ठरू लागल्यामुळे अत्यंविधीसाठी मृतांच्या अक्षरषः रांगा लागत होत्या. आज कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला यश येत असले तरी मृतांचा आकडा घटलेला दिसत नाही. आज देखील दिवसाला सुमारे पन्नास लोकांचा मृत्यू होत आहे. मृतदेहाची वेळेत योग्य विल्हेवाट लावण्यासाठी विद्युत दाहिन्यांची संख्या वाढवण्याची मागणी पालकमंत्री तथा वित्तमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली होती, अशी माहिती माजी आमदार विलास लांडे यांनी दिली.
राज्य सरकारने पिंपरी-चिंचवडमध्ये आवश्यक त्या ठिकाणी नवीन शवदाहिन्या बसवण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. ज्या भागातील शवदाहिन्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे, त्याठिकाणी नवीन हायब्रिड पध्दतीच्या गॅस व विद्युत इंधनावर चालणा-या दाहिन्या कार्यान्वीत करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या कामाचा आराखडा आणि होणारा अपेक्षित खर्चाचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामध्ये निगडी, भोसरी, कस्पटे वस्ती, पिंपळे गुरव, कासारवाडी या भागातील दाहिन्यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागणार आहे. या कामासाठी सुमारे 25 कोटी पर्यंतच्या खर्चाची रक्कम (अनुदान) राज्य सरकार पालिकेला अदा करणार आहे. उर्वरीत खर्च पालिकेला स्वतःच्या तिजोरीतून भागवावा लागणार आहे. हे काम मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा करून पुणेनंतर पिंपरी-चिंचवडला प्राधान्य दिले आहे. याबद्दल संबंध पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने माजी आमदार विलास लांडे यांनी पालकमंत्री अजित पवार यांचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे आभार मानले आहेत.