शबनम न्युज / पिंपरी
एका करामती भाच्याने हॉटेल रेस्टॉरंट बार व वाईन शॉपचे लायसन्स काढून देण्यासाठी मामाकडून ७० लाख घेतले. तर एकाच्या मुलाला नोकरी लावून देतो असे सांगून १७ लाख उकळले. भाच्याने स्वतःच्या मामासहित एकाला गंडा घातल्याचा प्रकार चिंचवड येथे घडला आहे. त्याने एकूण ९३ लाख ४० हजार ७३८ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी भाच्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृष्णदेव बबन काशिद (रा. लोहगाव,) असे आरोपी भाच्याचे नाव आहे.
दत्तात्रय नारायण साळुंखे (वय ४६, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १८) फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिद हा साळुंखे यांचा भाचा आहे. हॉटेल रेस्टॉरंट बार व वाईन शॉपचे लायसन्स काढून देण्यासाठी काशिद याने मामाकडून वेळोवेळी रोख व एनईएफटीव्दारे ७० लाख सहा हजार ९८८ रुपये घेतले. मात्र हॉटेल रेस्टॉरंट बार व वाईन शॉपचे लायसन्स काढून न देता बनावट चलन व बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली. बनावट पावत्या देऊन त्याने मामाची फसवणूक केली. तसेच साळुंखे यांच्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला आहे, असे भासवून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी व वाहन सोडवून आणण्यासाठी चार लाख ३३ हजार ७५० रुपये घेतले.दुसरी व्यक्ती मोहन शामराव शिंदे (रा. वाघोली) यांना सर्व्हिसचे पैसे मिळवून देण्यासाठी व पेन्शन चालू करून देण्याचे काशिदने सांगितले. तसेच मोहन शिंदे यांचा मुलगा मयूर शिंदे याला कॉलेजमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगून त्याने मोहन शिंदे यांचा विश्वास संपादन केला. आणि त्यांच्याकडून १९ लाख रुपये घेतले. मात्र त्यानंतरही मोहन शिंदे यांना सर्व्हिसचे पैसे तसेच पेन्शन चालू न करून देता आणि त्यांचा मुलगा मयूर शिंदे याला नोकरी न लावून देता मोहन शिंदे यांची फसवणूक केली. आरोपी काशिद याने त्याचा मामा फिर्यादी साळुंखे तसेच मोहन शिंदे यांची एकूण ९३ लाख ४० हजार ७३८ रुपयांची फसवणूक केली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ भोये पुढील तपास करत आहेत.