शबनम न्युज / मुंबई
तौक्ते चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभाग व राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तरीही ओएनजीसीने या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ७०० कामगारांचा जीव धोक्यात टाकला. ओएनजीसीने सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न केल्यानेच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला असून ४० पेक्षा जास्त कामगार बेपत्ता आहेत. शेकडो कामगारांना नौदल आणि कोस्ट गार्डने वाचवले. ही घटना समोर आल्यानंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चौकशी नेमणार असल्याचे सांगितले. मात्र फक्त चौकशी करून चालणार नाही. जे या घटनेला जबाबदार आहेत त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, तसेच दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा मिळायला हवी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.