शबनम न्यूज / पुणे
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन केली मागणी.
रिक्षाचालक, फेरीवाले, टपरी पथारी हतगाडी धारक ,घरकाम महिला,साफसफाई कामगार, बांधकाम मजूर, कागद काच पत्रा वेचकमहिला, असंघटित कामगार कष्टकरी जनतेसाठी टास्क फोर्सची स्थापना करून त्यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय नेते बाबा कांबळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली.
Covid-19 मुळे रिक्षा चालक, टपरी पथारी हातगाडी धारक, धुणी-भांडी काम करणाऱ्या महिला, कागद-काच-पत्रा वेचक, बांधकाम मजूर, शेत मजूर ,यांसह असंघटित क्षेत्रातील काम करणारे हातावर पोट असणारे कष्टकरी जनतेचे रोजगार गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्यावर दूरगामी परिणाम करणारे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पुढील काळात देखील असंघटित कामगार कष्टकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे त्यांच्या प्रश्नावर बारकाईने नीटपणे अभ्यास करण्यासाठी त्यांचे एकूण सध्या काय महत्वाचे प्रश्न आहेत त्यांची सध्या काय परिस्थिती आहे आणि त्यावर कोणत्या प्रकारे उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भामध्ये सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता असून याबाबत या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची टास्क फोर्स नेमण्यात यावी तरच असंघटित कामगारांचे प्रश्न मार्गी लागतील असे यावेळी बाबा कांबळे म्हणाले.
एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के हे असंघटित कामगार कष्टकरी आहेत कोरोना मुळे अनेक लोक उपासमारीमुळे दगावले आहेत याबाबत सरकारने योग्य उपाययोजना न केल्यास पुढील काळात देखील अनेक व्यक्ती उपासमारीमुळे दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रोज कमविणे आणि खाणे असा ज्यांचा उदरनिर्वाह आहे ,रोज कष्ट केल्याशिवाय घरांमध्ये ज्यांची चुल पेटत नाही, अशा कष्टकरी जनतेची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. कष्टकरी जनतेला कोरोना ने हैराण केले असून त्यांचे रोजगार गेले आहेत अशा परिस्थिती मध्ये कर्ज कसे फेडायचे आणि मुलाबाळांना कसं जगवायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अशा कठीण प्रसंगात त्यांचे अनेक प्रश्न बिकट झाले आहेत या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी असंघटित कामगार कष्टकरी जनतेसाठी टास्क फोर्स नेमून उपयोजना करणे आवश्यक आहे.