निर्णयाची २२ मे पासून होणार अंमलबजावणी
शबनम न्युज / पुणे
कोरोना काळात लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. या रिक्षाचालकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे नोंद असलेल्या चालकांना महाविकास आघाडी सरकारने रुपये दिड हजार अनुदान देण्याची घोषणा केली. यासंदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शनिवारपासून (दि. २२ मे) सुरु होत आहे. यासाठी रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. रिक्षाचालकांनी ऑनलाईन प्रणालीवर वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची नोंद केल्यानंतर संगणक प्रणालीवर आपोआप माहितीची पडताळणी होईल. आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यात दिड हजारांची मदत तात्काळ जमा केली जाणार आहे.
रिक्षाचालकांना अर्थसहाय्य देण्यासाठी आवश्यक असलेला निधी शासनाकडून उपलब्ध करण्यात आला असून ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांच्या संबंधित बँक खात्यात त्यांना एकवेळचे अर्थसहाय्य त्वरित जमा होणार आहे. अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.