■ ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था बळकट करा
■ लहान बालकांवर उपचारासाठी शहर व ग्रामीण भागात सुविधा निर्माण करा
■ मृत्यू दर कमी होण्यासाठी प्रयत्न करा
■ जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा
■ फायर ऑडिट न करणाऱ्या व औषधांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा
■ कोविड सेंटर तपासणीसाठी अधिकारी नियुक्त करा
■ ‘कोरोना’ प्रतिबंधक लसीकरणावर भर
पुणे, दि. 21 : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रमुख रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.
पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार ॲड अशोक पवार, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, आमदार सुनील टिंगरे, आमदार अतुल बेनके, आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार राहुल कुल, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार दिलीप मोहिते-पाटील तसेच यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, टास्क फोर्सचे डॉ. डी. बी. कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमधील धोका विचारात घेऊन वैद्यकीय सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, यंत्रसामग्री, लहान मुलांवरील उपचाराबाबत प्रतिबंधात्मक औषधे उपलब्ध करुन द्या. लहान मुलांसाठी रुग्णालयात स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करा.
अग्निशमन यंत्रणा- जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची अग्निशमन यंत्रणा तपासून घेऊन त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. फायर ऑडिट करुन न घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
वाढीव बिले आकारणी- रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून आकारणी करण्यात आलेल्या बिलांची तपासणी करुन वाढीव बिले आकारणाऱ्या तसेच रुग्णांसाठीच्या औषधांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
कोविड सेंटर तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती- कोविड सेंटर मध्ये आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार पद्धतीचे पालन, वैद्यकीय सुविधा आदी बाबींची पाहणी व नियंत्रण यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
‘म्युकर मायकोसिस’ वरील औषधांचे नियंत्रण- म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार होऊ नये तसेच रुग्णालयांना औषध पुरवठा सुरळीत होण्यासाठी या औषधांचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसीस अथवा अन्य काही लक्षणे जाणवतात का, याची माहिती दूरध्वनीवरून घेण्यात यावी, जेणेकरून वेळेत उपचार होतील.
लसीकरणावर भर- कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यावर भर देण्यात येत असून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील.
रुग्णदर नियंत्रणात – मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णदर कमी असल्याचे दिसून येत आहे, ही दिलासादायक बाब आहे. तथापि, मृत्युदर नियंत्रणात येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवा. ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता तसेच म्युकर मायकोसिस आजारावरील औषध पुरवठा, लहान बालकांसाठी आवश्यक उपाययोजना, वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा निर्माण कराव्यात. रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांची तपासणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
वाढीव बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई व्हायला हवी, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, लहान बालकांवरील वैद्यकीय उपचाराबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्यावतीने कोरोना नियंत्रणासाठी व नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या शहरी गरीब योजनेची माहिती दिली.
यावेळी आमदार ॲड अशोक पवार, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, आमदार सुनील टिंगरे, आमदार अतुल बेनके, आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार राहुल कुल, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार दिलीप मोहिते -पाटील यांनीही महत्वाचे विषय मांडले.
डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, रेमडीसीविर व प्लाझ्माचा वापर करु नये, अशा सूचना आयसीएमआरने दिल्या आहेत, याचे पालन रुग्णालयांनी करणे आवश्यक आहे. लहान बालकांसाठी आवश्यक वैद्यकीय सेवा सुविधा, कोविड -19 च्या नव्या स्ट्रेनच्या नियंत्रणासाठी व म्युकर मायकोसिससाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर कमी होताना दिसत आहे. लहान मुलांसाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा सुविधांची माहिती देवून पुणे जिल्ह्यातील रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, ऑक्सिजन व रेमडेसीवीर मागणी, पुरवठा कोविड-19 व म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. तसेच ऑक्सिजन, रेमडेसीविरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी माहिती दिली. निर्बंधांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली.
बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.