पिंपरी, दि. २१ मे २०२१ :- कोरोना संकट काळात सामाजिक बांधिलकीतून खासगी कंपन्यांनी विविध यंत्रसामुग्री देऊन केलेले सहकार्य महत्वाचे ठरते. कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी या यंत्रसामुग्रीची मदत होईल असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
चाकण येथील इंडोस्पेस डेव्हलपमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड उद्योग संघटनेच्या वतीने सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) ५ व्हेन्टिलेटर्स आणि ८ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स आज महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. महापालिकेच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी ही यंत्रसामुग्री स्विकारली. यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, इंडोस्पेस डेव्हलपमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड उद्योग संघटनेचे अध्यक्ष अमोल पाटील, भूषण जाधव, योगेश जाधव, विजय आटोळे आदी उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी महापालिकेची रुग्णालये अद्यावत सुविधांनी सज्ज ठेवण्यात आली आहेत. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता अधिक संख्येने उपकरणे, यंत्रसामुग्री आणि सुविधांची गरज सातत्याने भासत असते. अशा परिस्थितीत विविध कंपन्यांमार्फत सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) केलेली मदत महत्वाची ठरते असे महापौर उषा उर्फ माई ढोरे यावेळी म्हणाल्या.
कोविड विषाणूचा झपाट्याने प्रसार होत असताना, आवश्यक वैद्यकीय उपकरणांची गरजही वाढत आहे. ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स तसेच ऑक्सिजन सपोर्ट डिव्हाइसेसची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात मदत केल्याबद्दल महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सर्व कंपन्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेचा विचार करुन महापालिकेच्यावतीने पुढील नियोजन केले जात आहे, असे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले. विविध कंपन्यांसह सामाजिक संघटनांनीही कोरोना काळात आपले योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी, सामुहिक प्रयत्नांमुळे कोरोनावर मात करणे सहज शक्य असून प्रत्येकाने कोरोना विषयक नियमांचे कोटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले.