पिंपरी, 22 मे – महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले आकुर्डी, थेरगाव हॉस्पिटल तत्काळ सुरू करावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी या दोन्ही हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी एक स्वतंत्र विभाग निर्माण करावा. ऑक्सिजन, विद्युत यंत्रणा सज्ज ठेवावी. हॉस्पिटलच्या कामात कोणत्याही त्रुटी राहता कामा नयेत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. तसेच थेरगाव रुग्णालयात जळीत (बर्न) रुग्णांसाठी एक वॉर्ड आरक्षित ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.
खासदार बारणे यांनी आज (शनिवारी) महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या आकुर्डीतील 132 बेडच्या कै.ह.भ.प प्रभाकर मल्हाराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आणि थेरगांव येथील 184 बेडच्या हॉस्पिटलची पाहणी केली. हॉस्पिटलची सद्यस्थिती, बेडची संख्या, ऑक्सिजन, विद्युत यंत्रणा या सर्व कामाची पाहणी केली. रुग्णालयात कोणत्याही त्रुटी राहता कामा नयेत अशा सूचना प्रशासनाला दिल्या.
महापलिका आयुक्त राजेश पाटील, नगरसेवक प्रमोद कुटे, निलेश बारणे, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, रविंद्र नामदे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य बशीर सुतार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता राजन पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ. सुनिता साळवी, डॉ.सुनिता इंजिनियर, डॉ. पल्लवी, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे,श्रीनिवास कोरेवार उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, आकुर्डी, थेरगाव या हॉस्पिटलमधील काही बेड कोरोना रुग्णांसाठी सुरू केले जाणार आहेत. ही हॉस्पिटल अद्यावत प्रकारची आहेत. आकुर्डी हॉस्पिटल तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. तर, थेरगाव हॉस्पिटल काही दिवसांनी चालू होईल. या हॉस्पिटलच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडकरांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळतील.
शहरात जळीत (बर्न) रुग्णांसाठी हॉस्पिटल नसल्याने थेरगावमधील हॉस्पिटलची निर्मिती केली. या हॉस्पिटलमध्ये जळीत रुग्णांसाठी एक स्वतंत्र वॉर्ड ठेवावा. दोनही हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी एक स्वतंत्र विभाग निर्माण करावा. विजेचा तुटवडा, वीज बिलांची समस्या जाणवत आहे. त्यासाठी दोनही हॉस्पिटलमध्ये सौरऊर्जा प्रकल्प करावा, अशा सूचना खासदार बारणे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.