शबनम न्युज / मुंबई
विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त मानसिकतेतून टीका करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसरकारची यंत्रणा नुकसानाचा अंदाज घेऊन पंचनामे करत आहे. पालकमंत्री सातत्याने संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही भागाचा दौरा केल्यानंतर त्याचा अंदाज पंचनाम्याच्या माध्यमातून येईल. त्यानंतर निश्चितरूपाने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या स्टँडिंग ऑर्डर व्यतिरिक्त मदत देण्याची राज्य सरकारची भूमिका असेल असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र ते केंद्राकडे आग्रह धरत नाहीत, फक्त राज्य सरकार काय देणार यावर बोलत आहेत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.
मोदीजी पाहणीकरता महाराष्ट्रात आले नाहीत. मात्र त्यांनी गुजरातला १००० कोटींचे पॅकेज दिले. आता जनता प्रश्न विचारू लागल्यावर ते आमच्याकडे बोट दाखवत आहेत. आम्ही भरपाई देणार आहोतच पण आधी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. महाराष्ट्राला जास्त मदत मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी अपेक्षा नवाब मलिक यांनी व्यक्त केली.