लांडेवाडीत रिक्षाचालक सुविधा केंद्राची केली स्थापना
जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी योजनेचा लाभ घेण्याचे केले आवाहन
शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवडमधील रिक्षाचालकांना कोविडकाळात राज्य शासनाच्या 1500 रुपये अनुदान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी रिक्षाचालक सुविधा केंद्र सुरू केले आहे. राज्य शासनाच्या अर्थसहाय योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन माजी आमदार लांडे यांनी केले आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील रिक्षाचालकांसाठी कोविड काळात 1500 रुपये अनुदान योजना जाहीर केली आहे. ही रक्कम अल्प असली तरी कोविड काळात रिक्षाचालकांना आर्थिक उभारी देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारी आहे. ही रक्कम पिंपरी-चिंचवडमधील रिक्षाचालकांना मिळवून देण्यासाठी माजी आमदार लांडे यांनी रिक्षाचालक सुविधा केंद्र सुरू केले आहे. हे सुविधा केंद्र भोसरीच्या लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ याठिकाणी आहे.
याठिकाणी रिक्षाचालकांच्या नावाची नोंदणी करून घेतली जाते. त्याचा फॉर्म राज्य शासनाच्या संबंधित विभागाला पाठविला जातो. त्यानंतर अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होते. अशी ही प्रक्रिया असून आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी रिक्षाचालकांनी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ येथील महाविद्यालयात 24 ते 30 मे 2021 दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत कागदपत्रासह यावे.
रिक्षाचालकांनी पडताळणीसाठी आधार क्रमांकाशी बँक खाते लिंक असलेले पासबुक, वाहन क्रमांकाचे कगदपत्र आणि लायसन्स याच्या सांक्षिकीत प्रति घेऊन याव्यात. जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार लांडे यांनी केले आहे.