शबनम न्यूज / पिंपरी
महापालिका प्रशासनाने कॅब, रिक्षा, बसचालक, रुग्णवाहिका चालक आदी सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांचे प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करावे, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे- पाटील यांनी केली आहे.
याबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कोणत्याही वस्तुची वाहतूक करण्यासाठी वाहनचालकाची भूमिका खूप महत्वाची असते. त्यामध्ये कॅब, रिक्षा, टेम्पो, बस, अॅम्ब्युलन्स अशा कोणत्याही जड व हलक्या वाहनावरील चालकाला आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावावे लागते. लॉकडाऊनमध्ये देखील अपवाद वगळता वाहनचालक आपले काम करत आले आहेत. लॉकडाऊन असला तरी चालक वर्ग घरामध्ये बसला नाही. शहर तसेच देशाच्या प्रगतीमध्ये वाहनचालकांचे खूप मोठे योगदान आहे.
ट्रान्सपोर्ट लाईनवर जड मालाची वाहतूक करणा-या वाहनचालकांना आठ-आठ दिवस सुट्टी मिळत नाही. या राज्यातून त्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या शहरांमधून जात असताना त्यांचा रस्त्यामध्ये अनेकांशी संपर्क येत असतो. शहरामध्ये प्रवासी वाहतूक करणारे कॅबचालक, रिक्षाचालक, अॅम्ब्युलन्स अथवा बसचालक यांचा थेट प्रवशांसोबत संपर्क येतो. आपात्कालीन परस्थितीमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांना घेऊन हॉस्पीटलमध्ये दाखल करावे लागते. तसेच, रुग्णवाहिकेत बाधित रुग्ण असताना चालकाला जीव मुठीत घेऊन अपु-या सुरक्षा साधनांचा आधार घेऊन रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवावे लागते.
कोविड संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये वाहनचालकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. लसीकरण केंद्रावर वाहनचालकांना प्रधान्य देऊन लस देण्याची व्यवस्था करावी. जर वाहनचालकांचे लसीकरण पूर्ण झाले तर वाहनात बसून प्रवास करणा-या प्रवाशांना सुध्दा सुरक्षित वाटेल. चालकांच्या कुटुंबांमध्ये अनेक सदस्य असतात. लहान-मोठ्या मुलांचा परिवार असते. कुटुंबियांची सुरक्षा देखील वाहनचालकासाठी अतिशय महत्वाची असते. त्यामुळे या घटकाचे शंभर टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. लस दिल्यानंतर वाहनचालकांच्या आरोग्याला कोविड संक्रमणाचा होणारा संभाव्य धोका टळेल. आपण या घटकाला प्राधान्याने लस द्यावी, अशी मागणी मोढवे-पाटील यांनी केली आहे.
**
‘होम टू होम’ तपासणी मोहीम राबवा…
कोरोना महामारीतून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आपल्याला पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक नागरिकांची तपासणी करणे गरजेचे आहे. घरोघरी जाऊन नागरिकांची अँटीजेन टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. जे पॉझीटिव्ह आढळतील त्यांना योग्य उपचार द्यावे लागतील. जे निगेटिव्ह येतील त्यांच्यातील इम्युनिटी तपासून त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस द्यावे लागणार आहेत. संपूर्ण शहरात ही मोहीम राबविल्यास आपले शहर कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी आपल्याला लवकरात लवकर विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण, तिस-या लाटेचा संभाव्य धोका विचारात घेता शक्य तेवढ्या लवकर तपासणी मोहीम राबविणे गरजेचे आहे, असेही दीपक मोढवे पाटील यांनी म्हटले आहे.