राजकारणासाठी सत्तेचा दुरुपयोग निदंनीय, सविस्तर चौकशी व्हावी
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : कोरोना बाधित आणि कोरोनामूक्त झालेल्या शहरातील रुग्णांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या यंत्रणेकडून संपर्क साधला जात असल्याचे वृत्त समोर आले आहे. शहराच्या दृष्टीने ही धक्कादायक बाब आहे. नागरिकांनी प्रशासनाला दिलेली व्यक्तीगत माहिती सत्तेचा दुरुपयोग करून मिळवली जाते. यामागे राजकीय हेतू असल्याने कोरोना बाधित नागरिकांची माहिती भाजपकडे जाते कशी, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यामुळे या प्रकाराची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.
कोरोना बाधितांबाबत पुढे आलेल्या या गंभीर प्रकाराबाबत बोलताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले, देशात भाजप आणि भाजपचे सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले. गंगेतून वाहत गेलेले मृतदेह देशाने पाहिले. देशभरात भाजप सरकारची नाचक्की झालेली आहे. ही स्थिती असताना भाजप सुधारण्याचे नाव घेत नसल्याचे दिसते आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत कोरोना बाधित झालेल्या व कोरोना मुक्त झालेल्या नागरिकांना भाजपच्या यंत्रणेकडून संपर्क साधला जात असल्याची बातमी समोर आली आहे. ही बाब कोरोना बाधित नागरिक व महानगरपालिका प्रशासनाच्या बाबतीत गंभीर आहे.
कोरोना तपासणी केल्यानंतर कोरोना बाधित झालेल्या रुग्णांकडून उपचारासाठी व वैद्यकीय यंत्रणेच्या मदतीसाठी ही माहिती प्रशासनाला पुरविली जाते. कोरोना रुग्णांची माहिती उघड करण्यास नियमानुसार बंदी आहे. कोणत्याही कोरोना रुग्णाची माहिती प्रशासनाला उघड करता येत नाही. तरी देखील कोरोना रुग्ण व कोरोनामुक्त झालेल्या शहरातील नागरिकांची माहिती प्रशासनाकडून बाहेर गेली असेल, तर महानगरपालिका प्रशासन देखील संशयाच्या भोव-यात आहे. या संपुर्ण प्रकाराचे गांभीर्य ओळखून महानगरपालिका आयुक्तांनी याची दखल घ्यावी. ही माहिती सत्ताधा-यांच्या यंत्रणेपर्यंत कशी पोहोचली ? ती देण्यासाठी कोणी दबाव आणला का ? ही माहिती कोणत्या अधिका-यांनी आणि कशी त्यांच्यापर्यंत पोहोचवली ? या प्रश्नांची उत्तरे शहराला मिळावेत. अन्यथा या प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली जाईल, असे वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
– कोरोना बाधितांच्या माहितीचा निवडणुकीसाठी वापर निदंनीय
आगामी काळात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. हे सर्वश्रृत आहे. त्यापूर्वी कोरोनाबाधित व कोरोना मुक्त झालेल्या शहरातील नागरिकांची वैक्तीगत माहिती अशा पध्दतीने सार्वजनिक होते. ही माहिती मिळविण्यामागे निश्चित राजकीय मनसुबा आहे. राजकारणासाठी कोणात्याही थराला जाण्याची ही संस्कृती यातून प्रकषाने दिसते. कोरोनाबाधित नागरिकांच्या माहितीचा सत्तेच्या माध्यमातून असा दुरुपयोग करून त्याचा निवडणुकीसाठी वापर करणे, हे निदंनीय आहे, अशी भूमिका या निमित्ताने संजोग वाघेरे पाटील यांनी स्पष्ट केली.