शबनम न्यूज / पिंपरी
थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाने एका कोरोना बाधित रुग्णाकडून तब्बल दीड लाखांचे जास्तीचे बिल आकारल्याचे उघडकीस आले आहे. शासनाचे नियम डावल्याचे महापालिकेच्या ऑडिटमधून देखील निष्पन्न झाले. महापालिकेने जादाचे पैसे परत देण्यास सांगूनही हॉस्पिटलने ते दिले नाहीत. हा फक्त एक प्रकार समोर आला असून अनेकांकडून या हॉस्पिटलने वाढीव बिले आकारली आहेत. या हॉस्पिटलमध्ये वाढीव बिले देऊन रुग्णांची लूट करण्याचा प्रकार सर्रासपणे चालू आहे. त्यामुळे बिर्ला हॉस्पिटलवर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल प्रशासनाच्या मनमानी कारभार, अवास्तव बिल आकारणी बाबत यापूर्वीही महापालिका प्रशासनाला कळविले आहे. हॉस्पिलकडून जास्तीची बिल आकारणी केली जात असल्याचा तक्रारी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.
रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनुसार पोपट नाना शिंदे यांना 25 एप्रिल 2021 ला कोरोनाची लागण झाली. उपचारासाठी ते चिंचवडच्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यशस्वी उपचारानंतर 20 मे ला त्यांना डिस्चार्ज दिला. हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांकडे तब्बल 6 लाख 66 हजार 381 रुपयांचे वाढीव बिल दिले. उरलेली रक्कम भरत नाही, तोवर डिस्चार्ज देणार नाही, अशी अडवणूक हॉस्पिटलने केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
या अवास्तव बिलाची महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून लेखापरीक्षण करण्याची विनंती केली आता अधिका-यांनी बिलाची पूर्ण तपासणी केली असता बिर्ला हॉस्पिटलने तब्बल 1 लाख 55 हजार 523 रुपये जादा बिल आकारल्याचे उघड झाले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने या वाढील बिलाची रक्कम कमी करण्याचे लेखी पत्राद्वारे बिर्ला हॉस्पिटलला कळविले. परंतु, नेहमीप्रमाणे हॉस्पिटलने आडमुठी भूमिका घेतली. शिंदे यांच्याकडून संपूर्ण बिल वसूल केले.
ऑडीटमध्ये कमी करण्यात आलेल्या बिलाची रक्कम देखील हॉस्पिटलने परत केली नाही. आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये रुग्णांना वाढीव बिले देऊन लूट करण्याचा प्रकार सर्रासपणे चालू आहे. पोपट शिंदे या रुग्णाकडून वाढीव बिल घेतल्याबाबत आणि झालेल्या प्रकारणाची गांभीर्याने दखल घ्यावी. योग्य ती कारवाई करावी. हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.
बिर्लातील एक प्रकरण उघडकीस आले, अशी हजारो प्रकरणे – बारणे
बिर्ला हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची लूट केली जात आहे. शासनाच्या नियमाला हरताळ फासला जातो. हॉस्पिटल प्रशासन मनमानी करत आहे. पैसे न भरल्यास रुग्णाला दमबाजी केली जात आहे. जास्तीचे बिल आकारुन पैसे उकळल्याचे बिर्ला हॉस्पिटलचे केवळ एक प्रकरण उघडकीस आले. अशी हजारो प्रकरणे आहेत. बिर्ला हॉस्पिटलने जास्तीचे बिल आकारुन कोरोना रुग्णांची लूट केली आहे. परंतु, नातेवाईक भितीने पुढे येत नाहीत. महापालिकेने जादाचे पैसे परत करण्याचे सांगून देखील बिर्लाकडून ते परत केले जात नाहीत. हे अतिशय संतापजनक, चुकीचे आहे. बिर्ला हॉस्पिटलवर वेळीच कारवाई करावी. अन्यथा त्यांचा उन्माद, उर्मटपणा, दादागिरी वाढेल, असेही खासदार बारणे म्हणाले.