पिंपरी – नुकतेच डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथे २६ दिवसाच्या बाळावर दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. भोसरी येथील २५ वय वर्ष महिलेची एका रुग्णालयात प्रसूती करण्यात आली होती. जन्म झालेल्या बाळाला जन्मजात हृदय संदर्भातील आजार असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले तात्काळ ऑपरेशन करावे लागेल पुढील उपचार न केल्यास बाळ जास्त दिवस जगू शकणार नाही याची कल्पना त्यांना दिली. कोरोनाच्या या कठीण प्रसंगी पुढील उपचारासाठी नातेवाईक दारोदार फिरत होते. रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठ्या आशेने पिंपरीच्या डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात बालकाला दाखल केले.
तात्काळ उपचार सुरु करून २४ तासाच्या आत या बाळाला शस्त्रक्रियेला घेण्यात आले. तीन किलो वजन असणारे नवजात बाळाला “ओब्स्ट्रेकटेट टोटल अनोमलस पल्मोनरी वीनस कनेक्शन”(TAPVC) हा आजार जडला होता त्याचे हृदयाचे कार्य व्यवस्थित होत नव्हते या बाळाची प्रकृती अतिशय चिंताजनक होती अश्या गंभीर स्थितीत मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते. तात्काळ डॉ.अनुराग गर्ग यांच्या नेतृत्वात खाली हृदय शल्यचिकित्सा करणा-या टीमने अतिशय गुंतागुंतीची व जोखीमेची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. करण्यात आलेल्या उपचारांना बाळाने सकारात्मक प्रतिसाद दिला तब्बल ४४ दिवस डॉक्टरांनी परिश्रम घेऊन बाळाला नवजीवन देण्याची किमया साधली. बालकाला त्याच्या आई वडिलांकडे सुपूर्त करण्यात आले तेव्हा डॉक्टर्स टीम मध्ये अभिमानाचे व आनंदाचे वातावरण होते. बाळाच्या आई वडीलानी सर्व टीम व रुग्णालयीन प्रशासनाचे आभार व्यक्त केले. जन्म झाल्यानंतर हे बाळ आपल्या घरी पहिल्यांदाच जात आहे यांचा आनंद आई वडीलच्या चेहऱ्यावर दिसत होते.
यामध्ये बालरोग भूल तज्ञ् डॉ. विपुल शर्मा, डॉ. संदीप जुनघरे, आणि हृदय शल्य चिकित्सक डॉ. आशिष डोळस, डॉ. स्मृती हिंदारिया, डॉ. रंजीत पवार व परिचारिका आणि कर्मचारीवर्गाचे या दुर्मिळ अश्या हृदय शस्त्रक्रियेत सहभाग होता.
“डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल मधील हृदयरोग शल्य चिकित्सा विभागामध्ये उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञान व उत्कृष्ट पायाभूत सेवा सुविधांमुळे आणि तज्ञ् डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे जटिल जन्मजात हृदय रोगाबाबतची दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया पूर्ण करण्यास यश मिळाले” असे मत डॉ. अनुराग गर्ग यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले “या ४ वर्षात विभागाने आतापर्यंत ७५० हुन अधिक हृदय शस्त्रक्रिया केल्याअसून यात १४० हुन अधिक लहान बाळाची हृदय शस्त्रक्रियेची नोंद आहे त्यापैकी ९० टक्के शस्त्रक्रिया या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुषमान भारत योजनांमार्फत करण्यात आल्या आहेत. यामध्ये ८०० ग्रॅमच्या बाळापासून ते ९२ वर्षीय वृद्ध रुग्णापर्यतचा यात समावेश आहे. आमच्या हृदय रोग शल्य चिकित्सा विभागामार्फत असंख्य बाल रुग्णांवर हृदय व संवाहिनी संदर्भातील विविध शस्त्रक्रिया यशस्वी केल्या असून ही बालके आता सामान्य जीवन जगत आहेत”.
कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उप कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांनी या यशस्वी शस्त्रक्रियेत सहभागी सर्वांचे कौतुक केले. अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या या टीमचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगितले. “कोरोनाच्या कठीण प्रसंगी, ही बातमी आनंदाची लहर व सकारात्मक दृष्टिकोण घेऊन येणारी आहे”