शबनम न्यूज / मुंबई
लक्षद्वीपमधील जनतेच्या भावनेच्या विरोधात कुठलाही निर्णय होऊ नये. त्यांच्यावर राजकीय अजेंडा लादू नये शिवाय प्रशासक म्हणून राजकीय व्यक्तीची नेमणूक चुकीची असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
लक्षद्वीपमध्ये भाजपच्या नेत्यांना प्रशासक म्हणून नियुक्त केल्यानंतर लक्षद्वीपमधील जनतेवर काही निर्णय लादण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीचा खासदार असताना जनतेवर जे निर्णय लादत आहेत ते अन्यायकारक आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
लक्षद्वीपमध्ये दारुबंदी असताना तिथे दारू सुरू करण्याचा निर्णय प्रशासकाने घेतला आहे. विविध निर्णय घेऊन जनतेच्या भावनेच्या विरोधात जे जनतेला मान्य नाही ते लादण्याचे काम होतेय. आजपर्यंत लक्षद्वीपमध्ये किंवा इतर केंद्रशासित राज्यात राजकीय व्यक्तीची नेमणूक झालेली नाही. आता भाजपकडून प्रफुल पटेल खेडा यांची नेमणूक करून राजकीय अजेंडा राबवण्याचं काम केंद्राकडून होतेय. ज्या व्यक्तीच्या दबावामुळे डेलकर नावाच्या खासदाराने आत्महत्या केली. त्यांची कार्यपद्धत दबाव निर्माण करण्याची आहे. खेडांना कळलं पाहिजे आमचा खासदार दबावाखाली झुकणार नाही, घाबरणार नाही. राष्ट्रवादी खासदारांच्या व लक्षद्वीप जनतेच्या पाठीशी उभी आहे. पवारसाहेबांनी यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.