शबनम न्यूज / प्रतिनिधी
1 जूनपासून पुन्हा 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, असं वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.राज्यातील पॉझिटिव्ही रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर स्लो गेलं पाहिजे. त्यामुळेच 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी करता लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरू आहे. तसेच गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण कमी झालं तिथे काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं
म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये ते वेळेवर मिळत नाहीत. या इंजेक्शनचं नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या झोळीत जेवढे इंजेक्शन टाकते त्याप्रमाणेच वाटप केलं जात आहे, असंही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलंय.
दरम्यान, लसीकरणाला लागणारा निधी आम्ही तयार करून ठेवला आहे. एका चेकने सर्व रक्कम द्यायला आम्ही तयार आहोत. हे आम्ही वारंवार सांगतोय. आता फक्त केंद्राने लस द्यायला हवी, असं त्यांनी सांगितलं. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत देशात अजून कोणतंही धोरण ठरलेलं नाही. मात्र, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं सांगितलं जातंय. आम्ही त्याची सगळी तयारी करत आहोत, असंही राजेश टोपेंनी स्पष्ट केलंय.