शबनम न्युज / पुणे
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत ४४२ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या ४४२ रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार आहे. आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य सेवा (उपसंचालक) डॉ. मिलींद मोरे, आरोग्य सेवा पुणे मंडळाचे (उपसंचालक) डॉ. संजोग कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्याच्याअर्थसंकल्पात ४४२ रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उपलब्ध करण्यात आलेल्या निधीतून ४४२ नवीन रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली आहे. या रुग्णवाहिका राज्याच्या आरोग्य यंत्रणेत दाखल झाल्या आहेत. आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले. त्यापैकी पुणे विभागातील पुणे जिल्ह्यासाठी १२, सातारा १३, सोलापूर ९, कोल्हापूर १७ आणि सांगली ९ रुग्णवाहिकांचे आज वितरण करण्यात आले. राज्यातील इतर जिल्ह्यांना त्यांच्या मागणी
आणि गरजेनुसार रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
टाटा कंपनीमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ३०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ४ ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, टाटा कंपनीचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.