पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
कोरोना काळात औद्योगिक कंपन्यांमधील ऑक्सिजन वापरावर निर्बंध घालण्यात आले होते. कोरोना रुग्णालयांमध्ये औद्योगिक कंपनींमधील सुमारे ८० टक्के वापरला जात होता. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. तसेच, ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांना ऑक्सिजन पुरवठा पुर्ववत करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यथ तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कोरोना हॉस्पिटलसाठी प्रामुख्याने ८० टक्के ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कंपन्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनवर मर्यादा आणली होती. परंतु, आता पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटत आहे. तसेच, मोठ्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लँट उभारले आहेत. त्याचा परिणाम म्हणून रुग्णालयांना लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी ६० टक्क्यांनी घटली आहे. दुसरीकडे, रुग्णांची संख्याही कमी झाल्यामुळे उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी औद्योगिक कंपन्यांकडून होत आहे.
*
ऑक्सिजनअभावी उत्पादनावर परिणाम…
औद्योगिक कंपन्यांना लागणारा ऑक्सिजन पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे उद्योगांच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरात सुक्ष्म, लघु व मध्यम अशा ३५ हजाराहून अधिक कंपन्यांची ऑक्सिजनसाठी परवड होत आहे. वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा आहेत. परंतु, मेडिकल ऑक्सिजनची मागणी झपाट्याने घटत असल्यामुळे आता उद्योगांना पुरवठा करणेसुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे मेडिकल ऑक्सिजनची घटलेली मागणी लक्षात घेता उद्योगांना आर्थिक पेचातून बाहेर काढण्यासाठी उद्योग ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.