शबनम न्यूज / प्रतिनिधी
सोलापूर : वेळापूर येथील अवैध दारु विक्रीवर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्याऱ्या चार आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. बाकी दोघांचा शोध घेण्यासाठी या भागात जोरदार कोम्बिंग ऑपरेशन सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे बेकायदा दारु विक्रीवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला काठीने बेदम मारहाण करण्याचा प्रकार काल रात्री घडला होता. यामध्ये वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे, पोलीस कर्मचारी विठ्ठल बंदुके हे गंभीर जखमी झाले असून पोलीस नाईक महेरकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनीसार, काल रात्री वेळापूर जवळ असलेल्या एका ठिकाणी बेकायदा दारू विक्री होत असल्याची माहिती वेळापूर पोलिसांना मिळताच येथे छापा टाकण्यासाठी पोलीस पथक गेले
मात्र पोलीस गाडीतून उतरताच एका गुन्हेगाराने लाकडी दांडक्याने पोलिसांवर हल्ला केला. यात पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांच्या डोक्याला मोठी जखम झाल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्याचा प्रयत्न करीत असताना या आरोपीने पोलीस निरीक्षकांना गाडीत ठेवत असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवरही जोरदार हल्ला केला. जखमी पोलिसांनी तातडीने गाडी दवाखान्याकडे हलवली. या हल्ल्याच्या वेळी एक आरोपी मारहाण करीत होता तर इतर चौघे त्याच्या मदतीला उपस्थित असल्याची माहिती दिली जात आहे.
या घटनेनंतर सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जोरदार कोम्बिंग ऑपरेशन सुरु करण्याचे आदेश दिले. दरम्यान या हल्ल्यातील मुख्य आरोपी फरार असून इतर चौघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांवर या हल्ल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारांना आता पोलिसांची भीती उरली नसल्याचे दिसत आहे. जखमी पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांवर अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे