पिंपरी – पिंपरी चिंचवडमधील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने शनिवार, रविवारी कडक असलेला ‘विकेंड लॉकडाऊन’ रद्द करण्यात आला आहे. पुणे महापालिकेनंतर आता पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी देखील तसे आदेश आज दिले आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड ‘विकेंड लॉकडाऊन’ रद्द केला असून अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
काय आहेत नवीन आदेश..
● पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड १९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी इकडील दि. १४.०४.२०२१ रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा (Essential Category) मधील खालील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस रोज सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
किराणा (Groceries), भाजीपाला, फळ विक्री दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थाची दुकाने (मटन, चिकन, अंडी, मासे विक्री दुकानांसह)
कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी).
पाळीव प्राणी खाद्याची दुकाने (Pets Shop).
पावसाळयाच्या हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणारी दुकाने.
चष्म्याची दुकाने
उर्वरित अत्यावश्यक सेवा (Essential Category) या दिनांक १४.०४.२०२१ व वेळोवेळी निर्गमितकरण्यात आलेल्या आदेशानुसार सुरु राहतील.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड १९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी इकडील दि.१४.०४.२०२१, दि.१७.०४.२०२१, दि.२०.०४.२०२१, दि.२२.०४.२०२१ दि.३०.०४.२०२१. दि.१३.०५.२०२१ व दि.१९.०५.२०२१ रोजी निर्गमित केलेले आदेश/मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.