देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले असताना सर्वत्र काहीसे नकारात्मक वातावरण आहे. अशा परिस्थितीत सकारात्मकतेचा संदेश देणारी एक घटना समोर आली आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामधील घाटणे गाव कोरोनामुक्त करण्यात गावचे सरपंच यशस्वी ठरलेत. गावचा सर्वात युवा सरपंच म्हणून निवडून आलेला हा ऋतुराज देशमुख नावाचा तरुण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश ऋतुराजला नेहमीच मिळाला. सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळताना पक्षाची हीच भूमिका जपत त्याने गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना सोबत घेऊन ‘बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’ ही मोहीम हाती घेतली. ऋतुराजच्या या मोहिमेला ग्रामस्थांचा देखील चांगला प्रतिसाद लाभला आणि गाव कोरोनामुक्त करण्यात यश आले.
एप्रिल महिन्याच्या सुरवातीला गावातील कोरोनाचे रुग्णांचे प्रमाण वाढू लागले. गावात कोरोनाचे दोन मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यानंतर गावाला कोरोनामुक्त करण्यासाठी ऋतुराजने रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीचा वापर केला. गावातील जे ग्रामस्थ शहरात जातात किंवा जनसंपर्क अधिक असलेले व्यवसाय करतात अशा ग्रामस्थांसाठी आवश्यकतेनुसार रॅपिड अॅन्टिजेन टेस्टिंग सुरू करण्यात आले. तसेच गावातील ४५ वर्षांवरील ग्रामस्थांचे लसीकरण करून घेणे, आशा वर्कर्सच्या मदतीने वेळोवेळी गावकऱ्यांची ऑक्सिजन लेव्हल, तापमान तपासून घेणे, गावातील प्रत्येक कुटुंबाला व्हिटॅमिनच्या गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, साबण यांचा समावेश असेलेले ‘कोरोना सेफ्टी कीट’ देणे अशा विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला. गावात विलिगीकरण कक्ष आणि मिनी कोविड सेंटर सुरू करून सर्व आवश्यक गोष्टींच्या उपलब्धतेबाबत ऋतुराजने विशेष लक्ष पुरविले.
त्याच्या प्रयत्नांना गावकऱ्यांची साथ लाभली आणि बघता बघता गावातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली व गाव कोरोनामुक्त झाला. सकारात्मकतेने आणि योग्य धोरणांनी आपण कोरोनाला हरवू शकतो हा संदेशच राष्ट्रवादीच्या या युवा सरपंचाने आणि घाटणे गावच्या लोकांनी दिलाय. सर्वांसाठी हे उदाहरण नक्कीच प्रेरणादायी आहे.