नदीपात्र व परिसरात पालिका जनजागृतीचे कामे हाती घेणार
शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
चिखली-कुदळवाडी प्रभागात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळापूर्व स्थिती असूनही प्रशासनचे काम कासवगतीने सुरु आहे. इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला व जाळला जातोय. त्यामुळे हवेचे प्रदूषण तर होतेच शिवाय मोठ्या पाऊसाने पूर परिस्थितीही उदभवू शकते.
याबाबत ‘फ’ प्रभागाचे स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी पालिकेकडे वेळीच पाउले उचलण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी चिखलीतील क्षेत्रीय आरोग्य अधिकारी तानाजी दाते यांची भेट घेऊन त्यांनी प्रभागातील इंद्रायणी नदी प्रदूषण, पावसाळा पूर्व नालेसफाई व आरोग्य समस्या तत्काळ मार्गी लावण्याची मागणी केली.
यादव म्हणाले की, प्रभागात पावसाळा पूर्व कामे हाती घ्यावीत. नालेसफाई, इंद्रायणीच्या संभाव्य पूरस्थितीच्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठीची कामे तातडीने सुरू करावीत, स्टॉर्म वॉटर, चेंबर लाईनची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्याची आवश्यकता आहे. गतवर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे प्रभागातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. नागरिकांना पाण्याचा सामना करावा लागला होता. त्यामुळे जिथे जिथे पाणी घरामध्ये घुसले होते. त्याची पाहणी करावी आणि तत्काळ कामाला सुरुवात करावी.
”प्रभागात नाले सफाईचे काम सुरु आहे. इंद्रायणी नदीपात्र व परिसरात कचरा न टाकण्याबाबतचा आवाहन फलक लावणार आहे. खासगी जागामालकाने आपल्या मोकळ्या क्षेत्राभोवती कुंपण करावे व सुरक्षारक्षक नेमावा, अशा सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत.”
– तानाजी दाते (क्षेत्रीय आरोग्य अधिकारी, पिं. चिं. मनपा.)