पिंपरी – :पिंपरी चिंचवडमध्ये अवास्तव दराने व्याजाचा धंदा करणाऱ्या लोकांचा सुळसुळाट झाला असून अशा अवैध सावकारी करणाऱ्या इसमाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली असून कोर्टाने त्याला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .
प्रविण बबन थोरात ( वय 34 , रा.अभिनव नगर , जुनी सांगवी ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .
याबाबत मोहन श्रीराम किनगे ( रा.जुनी सांगवी ) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अनुज्ञप्ती शिवाय सावकारी करुन आर्थिक फायद्यासाठी पिळवणूक करत असल्याची तक्रार फिर्यादी मोहन किनगे यांनी दिली होती . पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले होते . चौकशीअंती तक्रारदार यांनी आरोपीकडून 2019 मध्ये दरमहा 10 टक्के व्याजदराने 40 हजार रुपये घेतले होते . तक्रारदार यांनी आरोपींना व्याजापोटी सलग दोन वर्ष दरमहा गुगल पे / फोन पे द्वारे व्याजाचे पैसे दिले . तरीही आरोपीने तक्रारदार यांना ‘ तू माझे मुळ मुद्दल व व्याजाचे पैसे वेळेवर देत नाही म्हणून तुला मी मारुन टाकतो , तुला माहीत नाही मी कोण आहे ? ‘ अशी वारंवार धमकी दिली व तक्रारदार मोहन यांना घरात कोंडून जबरदस्तीने पैसे वसुल केले . पोलिसांनी आरोपी प्रविण थोरात याच्यावर महाराष्ट्र सावकारी ( नियमन ) अधिनियम 2014 कलम 39,45 या प्रमाणे गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये अवास्तव दराने व्याजाचा सावकारी धंदा करणाऱ्या व्यक्तीची माहीती द्या असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे यामध्ये ते म्हणतात, पिपंरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये जर कोणी अनुज्ञाप्तीशिवाय सावकारी व्यवसाय करीत असेल अथवा नियमबाहय कर्जावर अवास्तव दराने व्याज आकारुन आर्थीक पिळवणुक करीत असेल अश्या सावकारावर जरब बसण्यासाठी अश्या सावकारी करणा – या इसमांची माहीती स्थानिक पोलीस स्टेशन येथे अथवा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे देण्यात यावी.