येत्या दोन,तीन दिवसात निर्णय घ्यावा असा आदेश मा.अजितदादा पवार यांनी जिल्हाधिकार्यांना दिला
शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
शुक्रवार दिनांक २८/०५/२०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांनी विधानभवन पुणे येथे भेट दिली असता पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री. संदीप बेलसरे व सचिव श्री. जयंत कड यांनी अजितदादा यांची भेट घेऊन अतिरिक्त असलेला ऑक्शिजन साठा हा उद्योगांना पूर्ववत सुरु करावा यासंदर्भात निवेदन दिले.
पिंपरी चिंचवड ही औद्योगिक व कामगार नगरी म्हणून ओळखली जाते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात जवळपास ११ ते १२ हजार लहान मोठे लघुउद्योग कार्यरत आहेत. यापैकी ५ ते ६ हजार उद्योगांना औद्योगीक वापराकरिता ऑक्शिजनची गरज असते परंतु कोविड १९ ची दुसरी लाट ही मार्च २०२१ मध्ये चालू झाली. एप्रिल २०२१ मध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याकारणाने औद्योगिक वापराकरिता असलेला ऑक्शिजन पुरवठा हा पूर्णपणे थांबवून तो सर्व रुग्णाकरिता वापरण्यात आलेला आहे. या कालावधीत उद्योजकांनी दुसऱ्या पर्यायाचा वापर केला परंतु तो पर्याय खूप महागडा असल्याने उद्योजकांना परवडणारा नाही. आता सध्या मे महिन्यातील दुसऱ्या पंधरवाड्यात रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत असल्याने रुग्णांना देण्यात येणाऱ्या ऑक्शिजनच्या मागणीत देखील घट झालेली दिसून येत आहे.
उद्योगांना ऑक्शिजन पुरवठा करणाऱ्या उत्पादकांकडे जवळपास ३० ते ४० टक्के ऑक्शिजन साठा शिल्लक राहत आहे. असे संघटनेच्या पदाधिकार्यांनी अजितदादाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच चिंबळी व रांजणगाव या दोन ठिकाणी मागणी अभावी असलेले ऑक्शिजन प्रकल्प सध्या बंद आहेत. या दोन्ही ऑक्शिजन प्रकल्पाची दररोजची उत्पादन क्षमता १५०० सिलेंडरची आहे. या प्रकल्पात उत्पादित होणारा ऑक्शिजन साठा हा महाराष्टातील इतर जिल्ह्यांना देऊन शिल्लक राहत असलेल्या ऑक्शिजन साठयाचा अहवाल दोन दिवसात तयार करण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी डॉ. श्री. राजेश देशमुख यांना दिले. पिंपरी चिंचवड, तळेगाव, चाकण, येथे उत्पादित होणारा व अतिरिक्त शिल्लक राहत असलेला ऑक्शिजन साठा, पिंपरी चिंचवड, तळेगाव, चाकण, येथील उद्योगांना पूर्ववत सुरु करण्याकरिता येत्या दोन,तीन दिवसात निर्णय घ्यावा असा आदेश मा.अजितदादा पवार यांनी जिल्हाधिकार्यांना दिला .