पिंपरी चिंचवड शहर कांग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
शबनम न्यूज / पिंपरी
कॉंग्रेसला सत्तर वर्षाचा हिशोब मागणा-या भाजपाने केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर सात वर्षात काय केले ? असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे.
देशातील शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांचा हक्क डावलणा-या, इंधन दराची भरघोस भाववाढ करणा-या केंद्रातील भाजपा प्रणित मोदी सरकारच्या निषेधार्थ रविवारी (दि.30 मे) पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या पदाधिका-यांनी काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन केले. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब शिवरकर, कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, माजी आमदार मोहन जोशी, पुणे शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष कमल व्यवहारे, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोपाळ तिवारी, सचिव संजय बालगुडे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम गुंजाळ तसेच मकरध्वज यादव, चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, विशाल कसबे, हिरामण खवळे आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारवर टिका करताना साठे म्हणाले की, सत्तर वर्षात देशात स्थापन झालेल्या बॅंका, बंदरे, विमानतळ, रेल्वे, बीएसएनएल, पेट्रोलियम कंपन्या विकून मोदी सरकार जनतेच्या पैशाची लूट करीत आहे. फसवी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी, शहा यांनी एकही आश्वासन पुर्ण केले नाही. उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भाव देऊ असे शेतक-यांना आश्वासन दिले होते. ते पुर्ण करण्याएैवजी शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे आणले. शेतकरी विरोधी कायद्याला एक वर्ष झाले. या विरोधात दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करीत आहे. त्यांच्याकडेही मोदी, शहा सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. मोदी सरकारने एक रात्रीत नोटाबंदी लादली, जीएसटीची चुकीच्या पध्दतीने अंमलबजावणी केली. मार्च 2020 पासून सुरु झालेल्या कोरोनाच्या जागतिक महामारीवर नियंत्रण मिळवण्यात देखिल मोदी सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाच संकटात सापडली आहे. देशात पेट्रोल शंभरीपार गेले असून महागाईचा आगडोंब उसळला आहे. जनतेला महागाईच्या खाईत लोटणा-या या मोदी, शहा सरकारचे व भाजपचे पितळ उघडे पडले आहे, अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.