शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी, 31 मे – उद्योजक सुहास ढमाले यांच्या मदतीने, स्वित्झर्लंड मधील पिटर किलर अँड फॅमिली, रोटरी क्लब ऑफ निगडी आणि खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्याने औंध जिल्हा रुग्णालयाला पाच ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स मशीन , पाच मॉनिटर, पाच सिरिंज पाईप भेट देण्यात आले. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक नंदापूरकर यांच्याकडे आज (सोमवारी) ही वैद्यकीय सामुग्री सुपूर्द करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष प्रवीण घाणेगावकर, खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनचे सचिव
रवी नामदे, रोटरीचे प्रकल्प अधिकारी मुकुंद मुळे, रो. उद्योजक सुहास ढमाले, रो. जगमोहन सिंग, रो.कल्याणी कुलकर्णी, रो. सुजाता ढमाले, पुष्पा पमनानी, रो. संतोष आगरवाल, रो.शेखर झिलपेलवार, रो. गुरदीप सिंग, यावेळी उपस्थित होते. स्वित्झर्लंड मधील पिटर किलर अँड फॅमिली यांनी जिल्हा रुग्णालयाला मदत करण्यासाठी सुहास ढमाले यांच्याकडे आर्थिक रक्कम दिली. त्यात खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ निगडी यांनी आणखी आर्थिक मदतची भर टाकली. त्यानंतर वैद्यकीय सामुग्रीची खरेदी करून औंध जिल्हा रुग्णालयाला देण्यात आली.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “कोरोना विरोधातील लढाई मोठी आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या सध्या आटोक्यात आली आहे. पण, तिस-या लाटेचा धोका आहे. दुसऱ्या लाटेत काही ठिकाणी वैद्यकीय सामुग्रीची कमतरता भासली. त्यामुळे तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी यंत्रसामुग्रीसह सज्ज असणे आवश्यक आहे.
औंध जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर चांगले उपचार केले जात आहेत. जिल्ह्याच्या विविध भागांतून रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात. सर्वांवर अतिशय दर्जेदार उपचार केले जातात. रुग्णालयात उपचार घेऊन अनेक कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा यंत्रसामुग्रीसह सज्ज असावी. यासाठी औंध जिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स मशीन , मॉनिटर, सिरिंज पपं देण्यात आले. ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांना जास्त दिवस रुग्णालयात न थांबता घरच्या घरी ऑक्सिजनची उपलब्धता या मशीनमुळे होईल”.
फोटो ओळ- (खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक नंदापूरकर यांच्याकडे वैद्यकीय सामुग्री सुपूर्द करण्यात आली. यावेळी डावीकडून रवी नामदे, बारणे, डॉ. नंदापूरकर, प्रवीण घाणेगावकर, सुहास ढमाले,मुकुंद मुळे सुजाता ढमाले)