शबनम न्यूज / मावळ
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात विजेची समस्या सोडविण्यासाठी तसेच पावसाळ्यात विजेच्या समस्या निर्माण होऊ नये किंवा धोकादायक झालेल्या विद्युत डीपी बॉक्स मुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मावळ चे आमदार सुनील शेळके यांनी महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करून पावसाळ्यापूर्वी मावळातील कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर डीपी बॉक्स बदलण्यात यावेत, अशी मागणी केली होती.या मागणीनुसार महावितरणने आज पहिल्या टप्प्यात 80 डीपी बॉक्स व 10 ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर व धोकादायक झालेले डीपी बॉक्स बदलण्यात येणार असून यासाठी महावितरणकडून 400 डीपी बॉक्स 40 ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात 80 डीपी बॉक्स व 10 ट्रान्सफॉर्मर आज उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे शेतीपंप,पाणीपुरवठा पंप व घरगुती विजेची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
यावेळी आपल्या प्रतिक्रिया देतांना आमदार सुनील शेळके यांनी सांगितले कि वीज ही सर्वांचीच मूलभूत गरज असून वीजपुरवठा खंडित झाल्यास अनेक समस्या निर्माण होतात. ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा करण्यासाठी कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर असल्याने घरगुती वीज व कृषिपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. अनेक ठिकाणी विजेच्या कमी दाबाची समस्या निर्माण होत असल्याने नागरिक त्रस्त होतात. यासंदर्भात वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. तसेच अतिरिक्त वीज वापराचा ताण येऊन ट्रान्सफॉर्मर, डीपी बॉक्स खराब झाल्याने नवीन उपलब्ध होईपर्यंत ग्रामीण भागात चार ते पाच दिवस वीज पुरवठा खंडित होत होता. याचा परिणाम सार्वजनिक पाणीपुरवठ्यावर होऊन पाणीपुरवठा देखील विस्कळीत होत होता.