उरण तालुक्यात १९० तर, घारापुरी बेटावर १०० पत्रे वाटप
रायगड :- निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीतुन नागरिक सावरू पाहत आहेत तोच नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला पुन्हा झोडपून काढले. या घटनेमुळे मानसिकदृष्ट्या तसेच आर्थिकदृष्ट्या खचलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी पार्थ पवार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. उरण तालुक्यातील सागरी किनाऱ्यालगत वसलेल्या गावांना आणि मुंबईनजीकच्या घारापुरी (एलिफंटा) बेटावरील वस्त्यांना संस्थेच्या वतीने २९० पत्रे मोफत वितरित करण्यात आले. यामुळे वादळात ज्यांच्या घरांचे व दुकानांचे पत्रे उडून गेले; त्या सर्व नागरिकांना पत्रे मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार माजवला. पिकांची नासाडी झालीच; त्याशिवाय लोकांच्या घरांच्या छताचे पत्रे उडून गेले. गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संकटाने नागरिकांना हतबल करून सोडले असताना आता निसर्गाने दाखवलेल्या प्रकोपामुळे गोरगरीब आणखीन जास्त आर्थिक गर्तेत सापडले आहेत. ह्या नुकसानग्रस्त भागांना मदतकार्य पोहोचवण्यासाठी पार्थ पवार फाऊंडेशन ही संस्था पुढे सरसावली आहे. पार्थ पवार फाऊंडेशनमार्फत उरण तालुक्यातील पूनाडे गावात ३२ पत्रे मोफत देण्यात आले. याशिवाय चांदई गावात ७०, केळ्याचा माळ २०, रानसई ६८ असे एकूण १९० पत्रे विनामूल्य तौक्ते वादळामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांच्या घरांना उपलब्ध करून देण्यात आले. त्याचप्रमाणे घारापुरी बेटावर विनामूल्य १०० पत्रे वितरित केले. यापैकी ९० स्टीलचे पत्रे हे तेथील दुकानदारांना देण्यात आले तर, उर्वरित १० सिमेंटचे पत्रे घरांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. दरम्यान, छताविना उघड्यावर पडलेल्या घरांना पुन्हा पूर्वस्थितीत कसं आणायचं व त्यासाठी लागणारा खर्च ह्या मुख्य अडचणीतुन आमची सुटका झाली, याचं आम्हाला फार आनंद आहे. आम्ही युवानेते पार्थदादा पवार आणि पार्थ पवार फाऊंडेशनचे कायम कृतज्ञ राहू, अशा शब्दांत गावकऱ्यांनी आभार प्रकट केले.
राज्य सरकारने तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून गावांना आर्थिक मदत देऊ केली आहे. याच पार्श्वभूमीवर सहकार्य म्हणून पार्थ पवार फाऊंडेशन सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्यांना शक्य ती मदत करण्यास प्रयत्नशील आहे. दरम्यान, समाज आपल्याला घडवतो; आपण त्याचे देणे लागतो अशी युवानेते पार्थदादा पवार यांची विचारधारणा आहे. अशाच विचारांचा अवलंब करीत पार्थ पवार फाऊंडेशन लोकहितासाठी कार्यरत आहे.
सदर उपक्रम राबवताना उरण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. प्रशांत पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य श्री बाजीराव परदेशी, उरण पंचायत समिती उपसभापती शुभांगीताई पाटील, श्रीमती भावना घाणेकर, शेकाप पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. काका पाटील, शेकापचे तालुका सरचिटणीस श्री. मेघनाथ तांडेल तसेच घारापुरीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री त्रिकाल पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.