पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहे. याठिकाणी काम करणाऱ्या सुमारे १५० कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकले आहे. त्यामुळे संतत्प कर्मचाऱ्यांनी आंदोलनचा पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, भाजपाचे नगरसेवक विकास डोळस, कुंदन गायकवाड आणि स्वीकृत सदस्य सागर हिंगणे यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. तसेच, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासमोर कर्मचाऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले.
कोविड काळात महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून ऑटो क्लस्अर कोविड केअर सेंटर सुरू केले होते. ‘स्पर्श’ हॉस्पिटलकडे या सेंअरचे व्यवस्थापन होते. मात्र, उपचार मोफत असताना व्यवस्थापनातील काही लोकांनी रुग्णांकडून पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महापालिका सभागृहात बराच गदारोळ झाला होता. यावर महापालिका आयुक्तांनी ऑटो क्लस्टरचे व्यवस्थान अधिगृहीत केले होते.
दरम्यान, शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे महापालिका प्रशासनाने ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला. या सेंटरसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरुन काढून टाकण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी सेंटरबाहेरच ठिय्या मांडला आहे.
*
‘त्या’ कर्मचाऱ्यांना अन्य ठिकाणी समावून घ्या…
कोरोना पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना योद्धा म्हणून काम करणारे कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आज बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. वास्तविक, प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करताना नोटीस किंवा एक महिन्यांचा पगार देणे अपेक्षीत होते. ऐन कोरोना आणि लॉकडॉउनच्या काळात संबंधित कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांना रुजू करुन घ्यावे, अशी मागणी नगरसेवक विकास डोळस यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे. यावर आयुक्त पाटील आता काय निर्णय घेणार? याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.