यंदाच्या ऑनलाईन महोत्सवाचे स्वरूप – विविध स्पर्धात्मक कार्यक्रम, मार्गदर्शन सत्र आणि वृक्षारोपण
पुणे- मे महिना हा रोटरी युथ सर्विसेस मंथ म्हणून ओळखला जातो. विविध कार्यक्रमांचा समावेश असलेला ‘कवच’ हा युवा महोत्सव यंदा कोरोना मुळे ऑनलाईन साजरा करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक या तीन प्रकारच्या सुरक्षा कवचाची ची गरज भासत आहे. याच संकल्पनेवर आधारित ‘कवच युवा महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून याचे आयोजन रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्प, रोटरी क्लब पनवेल इलाईट, रोटरी क्लब पुणे वारजे तर संयोजन रोटेक्स 3131 व रोट्रॅक्ट जिल्हा 3131 तर्फे करण्यात आले आहे. रोट्रॅक्टर्स, इन्टरॅक्टर्स, रोटेरीयन व नाॅन रोटेरीयन यांनी या महोत्सवामध्ये सहभाग नोंदवला.
महोत्सवाची सुरवात विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाने करण्यात आली. स्पर्धांमधील सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. या कोरोना काळात स्वतःला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक रित्या सक्षम कसं ठेवावं याविषयी आयोजित चर्चासत्रात इंडियन मेडिकल असोसिएशन चे राज्य विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, समुपदेशक आनंद कुलकर्णी आणि बिझनेस गुरु राकेश जैन प्रखर यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्राची सुरवात राष्ट्रगीता ने करण्यात आली. रोटरी क्लबच्या पुणे जिल्ह्याच्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. फिजिकल इम्युनिटी संदर्भात बोलताना डॉ. भोंडवे म्हणाले, “गर्भावस्थेत, जन्माला आल्यावर आई च्या दूधातून आणि मनुष्याला रोग प्रतिकारशक्ती निसर्गतः मिळते. समतोल आहार, योग्य व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि व्यसनांपासून स्वत:ला दूर ठेवण्याने आपण आपली रोग प्रतीकारक शक्ती शाबूत ठेवू शकतो. कोविड रुग्णास दिल्या जाणाऱ्या विविध जीवनसत्व युक्त औषधांचा उपयोग हा रुग्णाच्या नष्ट झालेल्या पेशी दुरुस्ती साठी असतो या औषधांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हा निव्वळ गैरसमज आहे” ते म्हणाले, लशीकरण अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकाने केले पाहिजे त्या मुळे कोरोना पासून बचाव होण्याची शक्यता वाढते. समुपदेशक आनंद कुलकर्णी यांनी मानसिक सक्षमतेसाठी स्वयंशिस्त,स्पष्टता, ध्येय, सातत्य आणि नियोजन या पंचसुत्री चा अवलंब करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, आयुष्यात चढ उतार असतातच त्याचा सामना करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन हवा. बिझनेस गुरु राकेश जैन प्रखर यांनी आत्ताच्या काळात आर्थिक साक्षरते ची गरज असून अचूक गुंतवणूक, पैशाचा स्त्रोत, आर्थिक सक्षमते साठी पैशाचे योग्य नियोजन वेळीच करणे तसेच कमाई आणि खर्च याचा योग्य मेळ साधता येणे आवश्यक असल्याचे सांगितले.
चर्चासत्रा दरम्यान जैनी जडेजा आणि ध्वनिका शहा यांनी रोट्रॅक्ट मधील संघ स्थापना आणि त्याच्या कार्याविषयक माहिती सांगितली. रायला (रोटरी युथ लीडरशीप अवॉर्ड्स) चे चेअरमन विष्णु म्हात्रे यांनी रायला विषयी माहिती दिली. चर्चासत्रा नंतर रोटरी जिल्हा 3131 युवा चे संचालक वसंतराव मालुंजकर यांनी आभार मानले. आर. वाय. ई. संचालक अशोक भंडारी, एन.जी.एस. ई. संचालक नीरज मेहता, रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती च्या अध्यक्षा माया फाटक, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्प च्या अध्यक्षा अश्विनी शहा, रोटरी क्लब पनवेल इलाईट चे अध्यक्ष आशिष मेहता , रोटरी क्लब ऑफ पुणे वारजे चे अध्यक्ष विनायक पाटील, रोट्रॅक्ट जिल्हा 31 31 च्या जिल्हा रोट्रॅक्ट प्रतिनिधी श्रद्धा लामखडे, रोटॅक्स चे अध्यक्ष खुश संघवी इत्यादी या महोत्सवात सहभागी झाले होते.
जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी ५ जून रोजी ऑक्सिजन नेक्स्ट हा वृक्ष रोपणा च्या कार्यक्रमा ने महोत्सवाची सांगता होणार आहे.