गेवराई (बीड) : कपडे धुण्यासाठी गेलेल्या चौघी जणी गोदावरी नदीत बुडाल्या. यापैकी तिघींचा मृत्यू झाला आहे, तर एकीला वाचवण्यात यश आले. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील मिरगांव येथे धक्कादायक घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये आई, मुलगी आणि पुतणीचा समावेश आहे. रंजना गोडबोले (वय ३०, शीतल गोडबोले (१०) आणि अर्चना गोडबोले (१०) यांचा मृतांत समावेश आहे. तर आरती गोडबोले हिला वाचवण्यात यश आले असून या मुलीवर उपचार सुरु आहेत.
गेवराई तालुक्यातील मिरगाव हे गोदावरीकाठी वसलेले गाव असून याठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली. येथील महिला कपडे धुण्यासाठी नदीकाठी जातात.
दरम्यान रंजना गोडबोले, शीतल गोडबोले, अर्चना गोडबोले व आरती गोडबोले या देखील कपडे धुण्यासाठी याठिकाणी गेल्या होत्या.
यावेळी शीतल, अर्चना आणि आरती या तिघी जणी पाण्यात बुडत असल्याचे पाहून रंजना गोडबोले यांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले यात त्या स्वतः आणि शीतल ल अर्चना या दोघी बुडून मरण पावल्या. या धक्कादायक घटनेनंतर पोलीस आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. तलवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी घटनेचा पंचनामा करुन मयत तिघींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. या दुर्देवी घटनेने तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे