पिंपरी, दि. ३ जून २०२१ :- कोरोना विरुध्द सक्षमपणे लढा देण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याबरोबरच त्यांचा सहभाग असणेदेखील अत्यंत गरजेचे आहे. प्रभाग स्तरावर नागरी सहभाग असलेल्या कोविड दक्षता समित्यांचे व्यवस्थापन उत्तम पध्दतीने करण्यासाठी सामुहिक एकजुटीची आवश्यकता आहे असे प्रतिपादन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिका वॉर्ड स्तरावर सुक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने व्यवस्थापन करण्यासाठी आज आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण, उपआयुक्त मनोज लोणकर, मंगेश चितळे, चंद्रकांत इंदलकर, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांच्यासह कोरोना विषयक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले समन्वय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आणि महापालिकेचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या तिस-या लाटेला सामोरे जात असताना पहिल्या आणि दुस-या लाटेचा आलेला अनुभव, अडचणी तसेच निर्माण झालेल्या विविध समस्या यांचा एकत्रित विचार करुन नियोजन करण्यात येत आहे. यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी उपस्थित अधिका-यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. आयुक्त राजेश पाटील म्हणाले, तिस-या लाटेचे संकट थोपविण्यासाठी सुरुवातीपासूनच काळजी आणि दक्षता घेणे आवश्यक असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित तसेच लक्षणे सदृश रुग्णांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याकडे भर दिला पाहिजे. नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही तसेच उत्तम सेवा सुविधा मिळतील यादृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे.
वॉर्ड स्तरावर संस्थात्मक विलगीकरण कक्ष, कोरोना टेस्टींग सेंटर, फिव्हर क्लिनिक, क्षेत्रीय स्तरावर सुसज्ज वॉर रुम उभारताना कोविड दक्षता समितीच्या माध्यमातून प्रभावी यंत्रणा तयार करावी. लोकप्रतिनिधींसह सामाजिक दायित्व निभावू इच्छिणा-या कार्यकर्त्यांना या समितीमध्ये सहभागी करुन घ्यावे. लोकांमध्ये काम करण्याची भरपूर उर्जा असते, जनसेवेसाठी योगदान देण्याकरीता ते पुढाकार घेत असतात. ही उर्जा कोविड दक्षता समितीच्या कामामध्ये अधिक प्रोत्साहीत करेल. कोविड केअर सेंटर उभारताना त्यात नागरी सहभागा बरोबरच त्याठिकाणी चांगल्या दर्जाच्या सोई सुविधा उपलब्ध असतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा सूचना आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी दिल्या. विलगीकरणाकरीता आवश्यकतेनुसार सोसायटीमधील क्लब हाऊस अथवा रिकाम्या सदनिका उपलब्ध करुन देण्यासाठी सोसायटी प्रमुखांनी पुढे यावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी केले.