पिंपरी दि. ४ जुन : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी आजपासुन ओपीडी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांशिवाय इतर आजाराच्या रुग्णांना बाहयरुग्ण सेवा मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट मार्चपासून सुरू झाली होती. तेव्हापासून संपूर्ण यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे कोरोना रुग्णांसाठी समर्पित करण्यात आले होते. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढला होता. दररोज कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय होती. पिंपरी चिंचवडची कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली होती. अशा परिस्थितीत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल होऊन बरे झाले आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात आली आहे. अगदी मोजक्या संख्येने आता कोरोना रुग्ण मिळत आहेत. नागरिकही कोरोना नियमांचे पालन करत करीत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांचे उपचाराबाबत तसेच कोरोनाचा बिमोड करण्यात वायसीएमचा मोठा वाटा आहे. आता बाहयरुग्णांसाठी वायसीएम रुग्णालयामध्ये ओपीडी सूरू करण्यात आली आहे.