पिंपरी, दि. ४ जुन – पिंपरी-चिंचवड शहरातील किती लोकसंख्या कोरोना संक्रमित आहे, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागातील दहा हजार लोकांचे सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात पुढील आठवड्यापासून होणार असुन याद्वारे नागरिकांमधील कोविड -१९ संक्रमणाचा मागोवा घेण्यासाठी अँटीबॉडीजची (प्रतिपिंडे) तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार शहरात अंदाजे किती टक्के लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होत आहे याचा अंदाज घेण्यास मदत होणार आहे. अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
सेरो सर्वेक्षणात शहरातील भौगोलीक दृष्ट्या वेगवेगळ्या घटकातील व वेगवेगळ्या वयोगटातील तसेच वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांमधील अँटीबॉडीज (प्रतिपिंडे) तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे पुढील काळात शहरातील व्यक्तींच्या वय व स्थानानुसार वर्गीकरण करुन त्यांच्या आरोग्याबाबत उपाययोजना करण्यासाठी या सर्वेक्षणाचा फायदा होणार असुन कोविडजन्य परिस्थितीसारख्या रोगाच्या जोखमीचा अंदाज बांधणे सुलभ होणार आहे. या सर्वेक्षणांद्वारे शहरातील किती व कोणत्या भागातील लोकांना अद्याप संक्रमण झाले नाही याचादेखील अंदाज घेता येणार आहे. या सर्वेक्षणांमधून कोविड-१९ संक्रमण कसे वाढते याचा मागोवा घेता येईल. ज्यामुळे महापालिकेला भविष्यातील आरोग्यविषयक गरजा भागविण्यास मदत होईल.