लशींचा साठा उपलब्ध होताच 18 वर्षांपुढील नागरिकांचे त्वरित लसीकरण करावे – उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांची प्रशासनाला सूचना
शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या सध्या स्थिरावली आहे. त्यामुळे या कालावधीत जास्तीत-जास्त नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे. आता लशींची उपलब्धतताही वाढत आहे. त्यामुळे लशींचा साठा उपलब्ध होताच 18 वर्षांपुढील नागरिकांचेही त्वरित लसीकरण सुरु करावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार शहरातील खासगी रुग्णालयांनाही दरनिश्चित करुन पूर्ण क्षमतेने लसीकरणाची परवानगी द्यावी, अशी सूचना उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. तसेच या कालावधीत अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्यास तिसरी लाट आली तरी त्याचा दुस-या लाटेएवढा मोठा फटका बसणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहेत. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लस एकमेव पर्याय आहे. आजपर्यंत शहरातील पाच लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. लसीकरण झालेल्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. लसीकरणाचा मोठा फरक पडत आहे. त्यासाठी जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.
सध्या 44 वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण जलदगतीने पूर्ण करावे. लशींची उपलब्धतता देखील वाढत आहे. लशींचा साठा उपलब्ध होताच 18 वर्षांपुढील नागरिकांचेही त्वरित लसीकरण सुरु करावे. दुसरी लाट मोठी तीव्र होती. शहराला या लाटेचा मोठा फटका बसला. दुसरी लाट आता स्थिरावली आहे. त्यामुळे लसीकरण वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. या कालावाधीत जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर प्रशासनाने आपले लक्ष केंद्रित करावे. त्यादृष्टीने नियोजन करावे.
लशींच्या साठ्यांची उपलब्धतताही हळूहळू वाढत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रामध्ये वाढ करावी. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांनाही पूर्णक्षमतेने लसीकरणाची परवानगी देण्यात यावी. जेवढी रुग्णालये परवानगी मागतील. त्यांना दर निश्चित करुन लसीकरणाची परवानगी द्यावी. जेणेकरुन शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल. परिणामी, कोरोना बाधितांचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे तिसरी लाट आली. तरी, त्याचा दुस-या लाटेएवढा फटका बसणार नाही. जेवढे लवकर सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल. तेवढ्या लवकर शहर कोरोनामुक्त होईल, असेही उपमहापौर घुले यांनी निवेदनात म्हटले आहे.