आकुर्डी येथील ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालयाचा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
शबनम न्युज / पिंपरी
कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जात असताना शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षमतेने कार्यान्वित असून महापालिकेने नव्याने सुरु केलेली आकुर्डी आणि थेरगांव येथील रुग्णालये यासाठी महत्वपुर्ण ठरतील असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
आकुर्डी येथील ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय आणि थेरगांव रूग्णालय कोविड १९ रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यासाठी आज खुले करण्यात आले. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.
आकुर्डी येथे झालेल्या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य प्रमोद कुटे, नगरसदस्या शैलजा मोरे, मिनल यादव, वैशाली काळभोर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, आकुर्डी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साळवे आदी उपस्थित होते. तर थेरगांव येथे झालेल्या कार्यक्रमावेळी खासदार बारणे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते ढाके, आयुक्त पाटील, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते बारणे, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, नगरसदस्य अभिषेक बारणे, नगरसदस्या झामाबाई बारणे, अर्चना बारणे, स्विकृत सदस्य संदिप गाडे, संतोष माळेकर, माजी नगरसदस्य सिद्धेश्रर बारणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, शहर अभियंता राजन पाटील आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आकुर्डी येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर आभार सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी मानले.
अडचणीतून मार्ग काढत थेरगांव येथील रुग्णालयाची इमारत उभी राहिली आहे, असे नमुद करुन महापौर ढोरे म्हणाल्या, आमदार लक्ष्मण जगताप यांचे मार्गदर्शन सतत लाभत आहे. कोविडच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना नागरिकांसाठी राबविल्या आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेचा प्रभाव विचारात घेता महापालिका यंत्रणा सज्ज असून नियोजनबद्ध कामकाज करण्यात येत आहे. नागरिकांना चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका कटीबद्ध असून नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयांमुळे परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेने नागरिकांना चांगली आरोग्य व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे काम केले. रुग्णवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे दिलेले योगदान महत्वपुर्ण आहे. महापालिकेने चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. वैद्यकीय कर्मचारी देखील जोखीम पत्करुन सेवा बजावत आहेत. इतर शहरांच्या तुलनेत इथली व्यवस्था अतिशय उत्तम आहे. कोरोना उपचाराकरीता खाजगी रुग्णालयांनी आकारलेल्या अवाजवी बिलांबाबतच्या तक्रारी येत आहेत. महापालिकेने अधिकाधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्यास नागरिकांचा खाजगी रुग्णालयाकडे जाणारा ओढा कमी होईल. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहरात महापालिकेचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या कामाला थेरगांव रुग्णालयाच्या उभारणीतून मुर्त स्वरुप प्राप्त झाल्याची भावना यावेळी खासदार बारणे यांनी व्यक्त केली. महापालिकेने कोरोना काळात चांगली यंत्रणा राबविल्याबद्दल सर्वांचे कौतूक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसदस्य अभिषेक बारणे यांनी केले. सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले, तर आभार आयुक्त राजेश पाटील यांनी मानले.
सुमारे ४९ कोटी रुपये खर्च करुन थेरगाव येथे ८०७१ चौरस मीटर जागेत रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. याठिकाणी भविष्यात २०० खाटांचे नियोजन असून भाजलेल्या रुग्णांसाठी तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा तसेच इतर उपचारांसाठी देखील सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. तर आकुर्डी येथील रुग्णालय उभारणीसाठी ३९ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. ५ मजली असलेल्या या रुग्णालयामध्ये १०० खाटांचे नियोजन आहे. तुर्तास या दोनही रुग्णालयांमध्ये कोविड बाधितांना दाखल करुन उपचार करण्यात येणार आहे.