शबनम न्युज / पुणे
कोरोना काळात ‘व्यंगचित्रातून सांगू काही’ या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, कार्टूनिस्टस् कम्बाईन संस्था व तेर पॉलिसी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दिवंगत ज्येष्ठ पर्यावरण सामाजिक कार्यकर्ते आणि चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांना महाराष्ट्रातील दिग्गज व्यंगचित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून आदरांजली वाहिली.
ऑनलाईन झालेल्या चर्चासत्रात, तेर पॉलिसी सेंटरचे चेरमन डॉ.राजेंद्र शेंडे म्हणाले, ‘जोपर्यंत आपण निसर्गाशी आदराने वागत नाही. तोपर्यंत असे पेंडामिक्स निसर्ग आपल्याला देत राहील.चिपकोचे अध्यक्ष सुंदरलाल बहुगुणा यांनी निसर्ग पारतंत्र्यात असलेला स्वातंत्र्यात आणावा यासाठी देशाला नेहमी मार्गदर्शन केले. हे त्यांचे कार्य आपण पिढ्यानपिढ्या जपले पाहिजे’. तेर पॉलिसीच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.विनिता आपटे यावेळी बोलताना म्हणाल्या, ‘पर्यावरण वाचवण्यासाठी युवा पिढीने पुढे आले पाहिजे. बाहेर फिरताना मोटार बाईक न वापरता जास्तीत जास्त सायकलचा वापर करायला हवा.जेणे करून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही’.
या व्यंगचित्र प्रदर्शना बद्दल बोलताना आयोजक व्यंगचित्रकार धनराज गरड म्हणाले, ‘दिवंगत पर्यावरणवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचे कार्य आमच्या कुंचल्यातून रेखाटून त्यांना आदरांजली वाहण्याचे आमच्या कार्टूनिस्टस् कंबाईनच्या सर्व व्यंगचित्रकारांनी ठरवले. आणि या उपक्रमास तेर पॉलिसी सेंटर संस्थेने सहकार्य केले. दरम्यान, काही दिवसांत कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर ऑफलाइन पद्धतीने देखील हे प्रदर्शन नागरिकांना पाहता येईल अशी व्यवस्थाही आम्ही केलेली आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर या संवेदनशील घटकावर आम्ही व्यंगचित्रकारांनी कुंचल्यातून छोटेसे संदेश देण्याचे काम केले आहे.’
या आगळ्या वेगळ्या चित्र प्रदर्शनपर स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल ५३ व्यंगचित्रकार बांधवांनी सहभाग नोंदवला होता. सहभागी व्यंगचित्रांपैकी तीन व्यंगचित्रांची निवड यात करण्यात आली. प्रथम क्रमांक विवेक प्रभूकेळुस्कर, द्वितीय दिनेश धनगव्हाळ तर तृतीय क्रमांकाचा मान सोमेश्वर गजमल यांच्या व्यंगचित्रास मिळाला.या स्पर्धेचे परीक्षण व्यंगचित्रकार चारुहास पंडित आणि विश्वास सूर्यवंशी यांनी केले.स्पर्धेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला.
यावेळी, अतुल पुरंदरे,भटू बागले ,संजय मिस्त्री, योगेंद्र भगत, प्रशांत कुलकर्णी, उमेश चारोळे, शरयू फरकांडे, राधा गावडे, संजय मोरे, राम मांडूरके, गौतम दिवार आदीसह अनेक व्यंगचित्रकार या प्रदर्शनात सहभागी झाले होते.