मुडाना: नवजात नातवाला बघायला जात असलेल्या आजी आजोबावर क्रूर काळाने घाला घातला. दुचाकीवरून जात असलेल्या या दाम्पत्याला अज्ञात वाहनाने चिरडले. या हृदयद्रावक दुर्घटनेत वृद्ध पती पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर मुडाणा ते बिजोरा दरम्यान तेलतवाडी फाटा येथे रविवारी सकाळी ९.३० वाजता हा भीषण अपघात झाला.
मोहन भगाजी टेकाळे (६५) आणि अनुसया मोहन टेकाळे (६०) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचा मोठा मुलगा एसटी महामंडळात नोकरीवर आहे.
त्याचे गेल्या वर्षीच लग्न झाले. नुकतेच त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. उमरखेड येथे खासगी रुग्णालयात सुनबाईची प्रसूती झाली. आता नवजात नातवाला पाहण्यासाठी म्हणून टेकाळे दाम्पत्य रविवारी सकाळीच दुचाकीने (एमएच २९ बीजे ३६०८) उमरखेडकडे निघाले होते. मात्र अज्ञात वाहनाची धडक बसून नातवाला न पाहताच आजी-आजोबाचा करुण अंत झाला. अज्ञात वाहनाची धडक इतकी भीषण होती की, दोन्ही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले. मृतकाच्या खिशामध्ये आधार कार्ड मिळून आल्यामुळे त्यांची तात्काळ ओळख पटली.
टेकाळे दाम्पत्याची दोन्ही मुले बाहेरगावी असतात. त्यापैकी मोठा मुंबईला एसटी महामंडळामध्ये नोकरीला आहे. त्यालाच पुत्ररत्न प्राप्त झाल्यामुळे हे दाम्पत्य मोठ्या आनंदात जेवणाचा टिफिन आणि आवश्यक वस्तू घेऊन उमरखेड येथे नातवाला पाहण्यासाठी निघाले होते. लहान मुलगा सौदी अरेबियामध्ये कंपनीत कामावर आहे. सुखी संसाराचे दिवस पाहण्याची वेळ आलेली असतानाच या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. सवना या त्यांच्या मूळगावी एकाच चितेवर दोघांनाही मोठ्या मुलाने भडाग्नी दिला. नातवाला पाहण्याचे आजी-आजोबाचे स्वप्न अधुरेच राहून गेले.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे