पिंपरी, दि. ७ जून २०२१ – सेक्टर २२ यमुनानगर येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये सुरक्षा व आरोग्य विषयक त्रुटी आणि हलगर्जीपणा निदर्शनास आला असून त्याबाबत कारवाई करणेबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी प्रशासनास आदेश दिले आहेत.
यमुनानगर येथील अमरधाम स्मशानभूमीबाबत तक्रारी आलेल्या असल्याने त्याठिकाणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आज समक्ष जाऊन परिसराची पाहणी केली आणि कोविडने तसेच अन्य कारणाने मयत झालेल्या मृतदेहावर होणा-या अंत्यसंस्कार प्रक्रियेचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी आदेश दिले.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, मुख्य आरोग्य निरीक्षक सुधीर वाघमारे, महेश आढाव, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
महापौर माई ढोरे यांनी पदाधिका-यांसमवेत स्मशानभूमीची व सरपण साहित्याची पाहणी केली. महानगरपालिका कोविड बाधित मयतांच्या अंत्यसंस्कारासाठी ८ हजार रुपये इतका खर्च देत आहे असे असताना निकृष्ठ प्रतीचे लाकूड, कमी लाकडाचा वापर केल्यास मृतदेहाचे व्यवस्थित दहन होत नाही असे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सुरक्षा व आरोग्य कर्मचा-यांनी मयतावर अंत्यसंस्कार होत असताना ते पूर्ण होईपर्यंत जबाबदारीने काम केले पाहिजे. याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना महापौर माई ढोरे यांनी प्रभाग अधिकारी आणि कर्मचा-यांना दिल्या.