शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात सद्यस्थितीत लॅाकडॅाउनचे नियम शिथील करण्यात आलेले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरती वर्दळ वाढलेली दिसते. त्यामुळे मास्क वापरणे अपरिहार्य आहे. परंतु काही जण अद्याप सदर नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. त्यावर चाप बसविणेकरिता कोविड प्रतिबंधात्मक उपायांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून देण्याबरोबरच, बेजबाबदार विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी 480 कोविड मार्शलांची नेमणूक करण्यात आली आहे.
शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना समज देऊन ,त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच त्यांना मनपामार्फत मास्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे निर्धारित केलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकाने चालू ठेवल्यास, दुकानदारांवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तीन कर्मचाऱ्यांचे एक पथक, याप्रमाणे संपूर्ण शहरात 160 पथके तयार करण्यात आली आहेत .
शहरातील बाजारपेठा, मंडई, गर्दीची ठिकाणे,रहदारीचे रस्ते, इ. ठिकाणी सदर पथके लक्ष ठेवणार आहेत. विनामास्क आढळलेल्या नागरिकांवर कारवाई करून, त्यांना महापालिकेकडून एक मोफत मास्कही देण्यात येणार आहे. तसेच वसूल केलेल्या दंडातून दहा टक्के रक्कम, ही सदर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून मिळणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी वीस पथकांची नेमणूक करण्यात आली आहे .या पथकांची विभागणी करून, सकाळी सात ते रात्री अकरा या वेळात ती कार्यरत राहतील. असे नियोजन करण्यात आले आहे. यासंबंधीचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिल्या आहेत.