शबनम न्युज / पुणे
वनविभाग व ग्रीन सनसाईज हिल्स या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरणदिनी वाघोली टेकडीवर वड, पिंपळ, चिंच, आवळा आदी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी आर.जी. पुजारी यांनी दिली आहे. यावेळी मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल, वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, विभागीय वन अधिकारी बाळकृष्ण पोळ, ग्रीन सनराईज हिल्सचे अध्यक्ष चंद्रकांत नाकतोडे तसेच वन विभागाचे कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल म्हणाले, काही वर्षापूर्वी ओसाड अवस्थेत असलेली वाघोली टेकडी आज हिरवीगार झाली असल्याची बाब अत्यंत सुखावह आहे. या टेकडीप्रमाणेच लगतच्या ओसाड टेकड्यांवरही लोकसहभागातून वृक्षारोपण करुन वनराई उभी करावी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित करुन उद्याच्या श्वासाची तरतूद आपणासच करावी लागेल व त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करावी, असे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी यावेळी सांगितले.